इंग्लंड-वेस्ट इंडिज टी-२० मालिका; पाचव्या टी-२० सामन्यासह विंडीजचा मालिकेवर कब्जा

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजलाही संघर्ष करावा लागला. मात्र १९.२ षटकांत त्यांनी विजय साकारला.
इंग्लंड-वेस्ट इंडिज टी-२० मालिका; पाचव्या टी-२० सामन्यासह विंडीजचा मालिकेवर कब्जा
PM

त्रिनिदाद : डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोतीने (२४ धावांत ३ बळी) केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने निर्णायक पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ४ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह विंडीजने पाच लढतींची मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव १९.३ षटकांत १३२ धावांत संपुष्टात आला. मोतीने सलग दोन शतके झळकावणारा फिल सॉल्ट (३८), लियाम लिव्हिंगस्टोन (२८) व हॅरी ब्रूक (७) यांचे बळी मिळवले. जेसन होल्डरने दोन बळी मिळवून मोतीला उत्तम साथ देताना जोस बटलर (११) व सॅम करनचा (१२) अडथळा दूर केला. आंद्रे रसेल व अकील होसेन यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजलाही संघर्ष करावा लागला. मात्र १९.२ षटकांत त्यांनी विजय साकारला. शाय होपने ४३ चेंडूंत नाबाद ४३ धावा केल्या. शर्फेन रुदरफोर्ड (३०), जॉन्सन चार्ल्स (२७) यांनीही उपयुक्त योगदान दिले. मोती सामनावीर ठरला, तर मालिकेत सर्वाधिक ३३१ धावा करणारा सॉल्ट मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. इंग्लंडचा संघ आता थेट जानेवारीत भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळेल, तर विंडीजचा संघ जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

३ रोवमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली विंडीजने सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in