इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर ११८ धावांनी विजय

विजयासाठी २०२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८३ धावांत गारद झाला.
इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर ११८ धावांनी विजय

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर ११८ धावांनी विजय मिळविला. १८ चेंडूंत ३५ धावा करणाऱ्या आणि नंतर पाच धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेणाऱ्या सॅम करनला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह यजमानांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील निर्णायक सामना आता रविवार, २४ जुलै रोजी लीड्स येथे होणार आहे. चेस्टर ली स्ट्रीटवर दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना ६२ धावांनी जिंकला होता.

विजयासाठी २०२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८३ धावांत गारद झाला. आदिल रशीदने तीन विकेट्स घेतल्या. मोईन अली, रीस टॉप्ली यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. डेव्हिड विली आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. एक फलंदाज धावबाद झाला.

वर्ल्ड चॅम्पियनने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा ८३ धावांवर बाद केले आहे. यापूर्वी त्यांनी २००८ मध्ये नॉटिंगहॅममध्ये ही कामगिरी केली होती. ग्रॅम स्मिथने त्यावेळी संघाचे नेतृत्व केले होते.

दक्षिण आफ्रिकेचे पहिले चार फलंदाज केवळ पाच धावा करू शकले. गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळेच इंग्लंडला विजय मिळाला. वन-डे क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा इंग्लंड दक्षिण आफ्रिकेचा १००पेक्षा जास्त फरकाने पराभव केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in