
नॉटिंघम : इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी गुरुवारपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथे खेळवण्यात येणार आहे. या कसोटीसाठी निवृत्त जेम्स अँडरसनच्या जागी वेगवान गोलंदाज मार्क वूडचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लडंने पहिल्या लढतीत विंडीजला अवघ्या ३ दिवसांतच डावाच्या फरकाने धूळ चारली. या विजयासह इंग्लंडने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १८८ कसोटी सामने खेळणाऱ्या अँडरसनच्या कारकीर्दीतील ही अखेरची लढत होती. त्याने ७०४ बळी मिळवून लॉर्ड्सवर क्रिकेटला अलविदा केला. आता अँडरसनच्या निवृत्तीनंतर नव्या दमाच्या गोलंदाजांसह संघबांधणी करण्याचे इंग्लंडचे लक्ष्य आहे.
या कसोटीसाठी वूडला संधी देण्यात आली असून बेन डकेटही त्याची पत्नी बाळाला जन्म देण्याचे अपेक्षित असल्याने ऐन क्षणी सामन्यातून माघार घेऊ शकतो. त्यामुळे डॅन लॉरेन्सचा पर्यायही उपलब्ध आहे. मार्क वूड, गस ॲटकिन्सन व ख्रिस वोक्स वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. विंडीजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेट करणार असून मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी त्यांना ही कसोटी जिंकणे गरजेचे आहे.