वन डे सामन्यात इंग्लंडला गुंडाळले; बुमरा,हार्दिकची चहलला उत्तम साथ

लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताचा कर्णधार नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
वन डे सामन्यात इंग्लंडला गुंडाळले; बुमरा,हार्दिकची चहलला उत्तम साथ
Published on

अनुभवी लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने (४/४७) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून चहलला उत्तम साथ दिली.

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताचा कर्णधार नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विराट कोहली तंदुरुस्त झाल्याने त्याचे या लढतीसाठी संघात पुनरागमन झाले, तर श्रेयस अय्यरला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पहिल्या लढतीतील चुकांमधून बोध घेत इंग्लंडने यावेळीस सावध सुरुवात केली. बुमरा आणि मोहम्मद शमीचा पहिला स्पेल त्यांनी खेळून काढला.

हार्दिकचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने ४१ धावांवर इंग्लंडला पहिला झटका दिला. जेसन रॉय २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर चहलने इंग्लंडला फिरकीच्या तालावर नाचवले. कारकीर्दीतील ६३व्या सामना खेळणाऱ्या ३१ वर्षीय चहलने सर्वप्रथम धोकादायक जॉनी बेअरस्टोचा (३८) त्रिफळा उडवला. मग इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रूट (११) आणि बेन स्टोक्स (२१) या दोघांना चहलने पायचीत पकडले. शमीने जोस बटलरचा (४) अडसर दूर केल्यामुळे इंग्लंडची एकवेळ ५ बाद १०२ अशी दैना उडाली.

त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (३३), मोईन अली (४७), डेव्हिड विली (४१) या त्रिकुटाने झुंज दिल्यामुळे इंग्लंडने २०० धावांचा पल्ला गाठला. मोईन-विलीने सातव्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी रचली. हार्दिकने लिव्हिंगस्टोन, तर चहलने मोईनला जाळ्यात अडकवले. अखेरीस बुमराने रीस टॉप्लेचा (३) त्रिफळा उडवून इंग्लंडच्या डावावर ४९ षटकांत पूर्णविराम लगावला. प्रसिध कृष्णा, शमी यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

logo
marathi.freepressjournal.in