ऑस्ट्रेलियन तोफखान्यासमोर इंग्लंडच्या बॅझबॉलची कसोटी

प्रतिष्ठित ॲशेस मालिकेला आजपासून प्रारंभ
ऑस्ट्रेलियन तोफखान्यासमोर इंग्लंडच्या बॅझबॉलची कसोटी

बर्मिंगहॅम : बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ गेल्या वर्षापासून कसोटी क्रिकेटचे रूप पालटण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. त्याच्या या मोहिमेची खरी कसोटी शुक्रवारपासून सुरू होईल. कर्णधार पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा संघ प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत दोन हात करण्यासाठी सज्ज असून उभय संघांतील पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी शुक्रवारपासून बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येईल.

झॅक क्रॉली, बेन डकेट, स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, ओली पोप, हॅरी ब्रूक आणि मोईन अली यांसारखे तडाखेबाज तसेच जो रूटसारखा अनुभवी, संयमी फलंदाज इंग्लंडच्या ताफ्यात आहे. त्याशिवाय जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही वेगवान जोडी इंग्लंडची मुख्य ताकद आहे. ब्रँडन मॅकक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळावर भर दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर इंग्लंड कशी फलंदाजी करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास बळावला आहे. जोश हेझलवूड तंदुरुस्त झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि ट्रेव्हिस हेड असे डावखुरे, तर मार्नस लबूशेन व स्टीव्ह स्मिथ असे क्रमवारीतील आघाडीचे दोन फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहेत. नॅथन लायन हा फिरकीपटू त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. मात्र स्कॉट बोलंड, हेझलवूड व मिचेल स्टार्क यांच्यापैकी कुणा दोघांना संधी मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

३४-३२ आतापर्यंतच्या ७२ ॲशेस मालिकांपैकी ऑस्ट्रेलियाने ३४, तर इंग्लंडने ३२ मालिका जिंकल्या आहेत. यावरूनच दोन्ही संघांतील द्वंद्व अधोरेखित होते. उर्वरित सहा मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स ५, सोनी लिव्ह ॲप

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in