इंग्लंडची निराशाजनक सुरुवात,ऋषभ व जडेजाचे शानदार शतक

एजबस्टन कसोटीतील ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले
इंग्लंडची निराशाजनक सुरुवात,ऋषभ व जडेजाचे शानदार शतक

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात ३ बाद ६० धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या खेळात पावसामुळे व्यत्यय आला. इंग्लंड अद्यापही ३५६ धावांनी पिछाडीवर आहे.

त्याआधी, भारताचा पहिला डाव ४१६ धावांत संपुष्टात आला. शुक्रवारी ५ बाद ९८ अशा अवस्थेनंतर ऋषभ पंतने (१११ चेंडूंत १४६) डाव सावरणारी शतकी खेळी केल्यानंतर शनिवारी रवींद्र जडेजाने (१९४ चेंडूंत १०४) शानदार शतक झळकविले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. अवघ्या २७.५ षटकातच ५ बाद ९८ अशी दारुण अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला होता. मात्र उपकर्णधार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी डावाला आकार दिला. ऋषभनंतर जडेजाने शानदार शतक झळकविले.

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघाचा कर्णधार जसप्रित बुमराहने तुफानी फटकेबाजी करत स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा झोडपून काढल्या. एजबस्टन कसोटीतील ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले. भारताच्या डावातील ८४ वे षटक स्टुअर्ट ब्रॉड टाकत होता. या षटकामध्ये बुमराह फलंदाजी करत असताना ४, ५, ७, ४, ४, ४, ६, १ अशा तब्बल ३५ धावा निघाल्या. टी-२० िक्रकेट प्रकारात २००७ मध्ये माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने अशीच कामगिरी केली होती. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये ३६ धावा कुटल्या होत्या. ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली. त्याच्याविरुद्ध युवराज सिंगने सहा षटकार लगावले होते. बुमराहने एका षटकात ३५ धावा केल्या. बुमराहपूर्वी २००३ मध्ये जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात ब्रायन लाराने दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनच्या षटकामध्ये २८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१३ मध्ये जॉर्ज बेलीने पर्थ सामन्यात अँडरसनच्या एका २८ धावा केल्या होत्या. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने जो रूटच्या एका षटकात अशीच कामगिरी केली होती. त्यानेही एका षटकामध्ये २८धावा फटकविल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडने तर या सर्व गोलंदाजांना मागे टाकत एकाच षटकामध्ये तब्बल ३५ धावा उधळल्या आहेत.

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रवींद्र जडेजाने १८३ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे आणि परदेशी भूमीवरील पहिले शतक ठरले. शतक पूर्ण होताच तो जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.

यापूर्वी जडेजाने २०१८ मध्ये राजकोटमध्ये विंडीजविरुद्ध आणि मार्च २०२२ मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. या शतकाबरोबरच जडेजाने इंग्लंडमध्ये ५००कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडमधील ११ कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने ३०पेक्षा जास्त सरासरीने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी, इंग्लंडमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८६ होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in