अँडरसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर निवृत्त होणार

इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
अँडरसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर निवृत्त होणार

लंडन : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे. त्यामुळे अँडरसनच्या २० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीची अखेर सांगता होणार आहे.

इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या तसेच इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या ४१ वर्षीय अँडरसनने कसोटीत ७०० बळी घेतले आहेत. “सर्वांना नमस्कार, लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध होणारी पहिली कसोटी ही माझ्या कारकीर्दीतील अखेरची असेल,” असे अँडरसनने इंस्टाग्रामवर म्हटले आहे.

तो म्हणाला की, “देशाचे प्रतिनिधित्व करताना ही २० वर्षे माझ्यासाठी संस्मरणीय होती. लहान असल्यापासूनच देशाचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा होती. आता निवृत्तीचा निर्णय घेताना मला खूप जड जात आहे. पण हीच योग्य वेळ असल्याचे मनाला सांगून मी बाजूला होत आहे.” इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक ब्रँडन मॅककलमने आम्ही भविष्यकडे लक्ष केंद्रित करून २०२५-२६च्या ॲॅशेस मालिकेसाठी इंग्लंडची संघबांधणी करत आहोत, असे सांगितल्यानंतर काही दिवसांनी अँडरसनने निवृत्तीची घोषणा केली.

अँडरसनने २००३ साली कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने १८७ कसोटी सामन्यात ७००पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. मार्च महिन्यात धरमशाला कसोटीत त्याने ७००वा बळी मिळवला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत तो श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८ बळी) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘जिमी’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या अँडरसनच्या नावावर इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर (२०० सामने) दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अँडरसन त्याच्या लँकेशायर संघाकडून कौंटी क्रिकेटमध्ये खेळेल की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. त्याने १९४ वनडेत २६९ तर १९ टी-२० सामन्यात १८ विकेट्स मिळवले आहेत. टी-२० वर्ल्डकप विजेत्या इंग्लंड संघाचा तो एक भाग होता. १० जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला लॉर्ड्स येथून सुरुवात होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in