गुवाहाटी : भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शनिवारचा दिवस विविध कारणांनी संस्मरणीय ठरणार आहे. एकीकडे ऋषभ पंत प्रथमच भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे, तर गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना रंगणार आहे. मात्र या सर्व बाबींसह भारतापुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान असेल. उभय संघांतील दुसऱ्या कसोटीला शनिवारपासून प्रारंभ होत असून या लढतीत खेळपट्टीचा मुद्दाही चर्चेचा विषय ठरत आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने २६ वर्षीय गिलला दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीला मुकणार असून २८ वर्षीय पंत भारताचा ३८वा कसोटी कर्णधार म्हणून शनिवारी मैदानात उतरणार आहे.
गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.
या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.
आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू असून विशेषत: सायमन हार्मरविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. त्यामुळे या कसोटीवर सर्वांच्या नजरा असतील.