गिलच्या शतकानंतरही वर्चस्वाची संधी गमावली! ३९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६७

गिलने १४७ चेंडूंत साकारलेल्या १०४ धावांच्या खेळीनंतरही भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली.
गिलच्या शतकानंतरही वर्चस्वाची संधी गमावली!
 ३९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६७

विशाखापट्टणम : गेल्या वर्षभरापासून कसोटी प्रकारात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या युवा शुभमन गिलने रविवारी अखेर शतकाद्वारे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र गिलने १४७ चेंडूंत साकारलेल्या १०४ धावांच्या खेळीनंतरही भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवण्याची संधी गमावली. इंग्लडपुढे विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य असून भारतात आजवर कोणत्याही संघाने कसोटीच्या चौथ्या डावात इतक्या धावा केलेल्या नाहीत, हे विशेष.

विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १४ षटकांत १ बाद ६७ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्याचे अद्याप दोन दिवस शिल्लक असून इंग्लंडला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी आणखी ३३२ धावांची गरज आहे. त्यामुळे बेन स्टोक्सच्या इंग्लंडला भारतीय भूमीवर ऐतिहासिक यश संपादन करण्याची संधी आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला त्यांचे ९ फलंदाज बाद करायचे आहेत. त्यामुळे एकूणच सामना रंगतदार स्थितीत असून चौथ्या दिवशीच कसोटीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर झॅक क्रॉली २९, तर नाईटवॉचमन रेहान अहमद ९ धावांवर नाबाद होता. रविचंद्रन अश्विनने बेन डकेटच्या (२८) रुपात भारताला पहिले यश मिळवून दिले.

तत्पूर्वी, शनिवारच्या बिनबाद २८ धावांवरून पुढे खेळताना भारताकडे १७१ धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताला संपूर्ण दिवस फलंदाजी करून इंग्लंडपुढे किमान ४५० ते ५०० धावांचे लक्ष्य ठेवण्याची संधी होती. मात्र त्यांचा दुसरा डाव ७८.३ षटकांत २५५ धावांत संपुष्टात आला. रोहितचा (१३) जेम्स अँडरसनने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात त्रिफळा उडवला. मग त्याने पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वाललासुद्धा (१७) माघारी पाठवले.

२ बाद ३० धावांवरून गिल व श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. दोघांनाही संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी मोठी खेळी करणे गरजेचे होते. श्रेयसच्या तुलनेत गिलने यावेळी फिरकीपटूंविरुद्ध मुक्तपणे फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भर घातली. टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर स्टोक्सने श्रेयसचा २९ धावांवर अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पदार्पणवीर रजत पाटिदारही (९) स्वस्तात बाद झाला. गिलने यादरम्यान अर्धशतकाची वेस ओलांडली. उपहाराला भारताची ४ बाद १३० अशी स्थिती होती.

२४ वर्षीय गिलने मग सहाव्या क्रमांकावरील अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली. अहमदच्या एकाच षटकात त्याने एक षटकार व दोन चौकार वसूल केले. ५२व्या षटकात त्याने कारकीर्दीतील तिसरे कसोटी शतक साकारले. मात्र पुढच्याच षटकात रिव्हर्स स्वीपचा फटका लगावण्याच्या प्रयत्नात गिल शोएब बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ११ चौकार व २ षटकारांसह खेळी सजवली. गिल बाद होताच भारताचा डाव घसरला.

अक्षरला (४५) हार्टलीने पायचीत पकडले. के. एस. भरत (६), कुलदीप यादव (०), जसप्रीत बुमरा (०) यांनी निराशा केली. अश्विनने २९ धावा काढत भारताची आघाडी ३९८पर्यंत नेली. अखेर अहमदने त्याला बाद करून भारताचा डाव संपुष्टात आणला. इंग्लंडसाठी हार्टलीने चार, तर अहमदने तीन बळी मिळवले.

आकडेवारी

गिलने कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावले. गेल्या १३ डावांत प्रथमच त्याने ५०हून अधिक धावा केल्या. यापूर्वी मार्च २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने अखेरचे कसोटी शतक साकारले होते.

४९७

अश्विनच्या कसोटी कारकीर्दीतील बळींची संख्या ४९७ झाली असून ५००चा टप्पा गाठण्यापासून तो फक्त ३ विकेट्स दूर आहे.

ब्रँडन मॅकलमने प्रशिक्षकपद व स्टोक्सने कर्णधारपद स्वीकारल्यापासून इंग्लंडने १० पैकी ८ कसोटींमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

३७८

भारताविरुद्ध कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम इंग्लंडच्याच नावावर आहे. त्यांनी २०२२मध्ये एजबॅस्टन येथे ३७८ धावांचे लक्ष्य हासिल केले होते.

३८७

भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटीच्या चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करण्यात आलेली धावसंख्या ही ३८७ आहे. २००८मध्ये चेन्नई येथे भारताने इंग्लंडविरुद्धच सचिन तेंडुलकरच्या शतकाच्या बळावर ही कामगिरी केली होती

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ११२ षटकांत सर्व बाद ३९६

इंग्लंड (पहिला डाव) : ५५.५ षटकांत सर्व बाद २५३

भारत (दुसरा डाव) : ७८.३ षटकांत सर्व बाद २५५ (शुभमन गिल १०४, अक्षर पटेल ४५; टॉम हार्टली ४/७७, रेहान अहमद ३/८८)

इंग्लंड (दुसरा डाव) : १४ षटकांत १ बाद ६७ (झॅक क्रॉली २९*, बेन डकेट २८, रेहान अहमद ९*; रविचंद्रन अश्विन १/८)

logo
marathi.freepressjournal.in