विजयानंतरही भारत बाहेर;पाकिस्तानची मात्र आगेकूच

श्रीलंकेत झालेल्या त्या विश्वचषकात भारताने गटसाखळीत इंग्लंड व अफगाणिस्तान संघांना सहज धूळ चारली.
विजयानंतरही भारत बाहेर;पाकिस्तानची मात्र आगेकूच

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. परंतु त्यानंतर पुढील तिन्ही विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. त्यातच २०१२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने सुपर-आठमधील अखेरची लढत जिंकूनही त्यांना गाशा गुंडाळावा लागला. तर दुसरीकडे भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला.

श्रीलंकेत झालेल्या त्या विश्वचषकात भारताने गटसाखळीत इंग्लंड व अफगाणिस्तान संघांना सहज धूळ चारली. त्यानंतर भारताने सुपर-आठमधील पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला. मग भारताने विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवले. पाकिस्तानने अन्य दोन लढतींमध्ये मात्र ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेला हरवले. त्यांचा नेट रनरेटही भारतापेक्षा वरचढ होता. अखेरीस भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आफ्रिकेला किमान २६ धावांच्या फरकाने नमवणे आवश्यक होते. तसे झाले तरच पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाऊन भारतीय संघ पात्र झाला असता.

आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबर रोजी झालेल्या त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सुरेश रैनाने ४५ धावा फटकावल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवातसुद्धा अडखळती झाली. अखेरीस आफ्रिकेचा डाव १९.५ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला व भारताने अवघ्या एका धावेच्या फरकाने थरारक विजय मिळवला. मात्र आफ्रिकेला २६ धावांच्या फरकाने भारताला जमले नाही व साहजिकच पाकिस्तानने आगेकूच केली. या विजयानंतरही पुढे जाऊ न शकल्याने विराट कोहलीला अश्रू अनावर झाले होते.

आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकाला आता अवघे सहा दिवस शिल्लक असताना भारतीय संघ यावेळी उपांत्य फेरी नक्कीच गाठेल, अशी अपेक्षा बाळगू. यावेळी भारताला गटसाखळीत पाकिस्तान, आफ्रिका व बांगलादेश संघांना सामोरे जायचे आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in