पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष केल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट हिने प्रस्थापितांच्या नाकावर टिच्चून अंतिम फेरीत धडक मारली. जपानच्या सुई सुसाकी, युक्रेनच्या ओक्साना लिवाच आणि उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमान या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवत विनेश फोगटने ५० किलो वजनाची अंतिम फेरी गाठली, पण अंतिम लढतीत खेळताच न आल्याने आणि पदकाविना बाद व्हावे लागल्याने विनेश फोगटचा अपेक्षाभंग झाला आहे. मंगळवारी वजन तपासणी करताना विनेशचे वजन ५० किलोच्या आत होते. मग तिचे वजन दुसऱ्या दिवशी अडीच किलोने कसे वाढले, याबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत.
मंगळवारी वजन केल्यानंतर विनेशने तीन लढती जिंकल्या. त्यावेळी तिने थोडेसे पाणी आणि अन्न प्राशन केले. मात्र अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर विनेशने जेव्हा आपले वजन केले, तेव्हा ते ५२.५०० किलो इतके होते. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी तिने हरतऱ्हेचे प्रयत्न केले. रात्रभर ती झोपली नाही. स्वेट सूट (शरीरातून घाम निघण्यासाठी घालण्यात येणारा पेहराव) घालून तिने प्रचंड दोरीउड्या मारल्या, व्यायाम केला. सायकलिंग तसेच जॉगिंगही केले. अन्नपाण्याविना हे सर्व काही करत राहिली. शरीरातील रक्तही काढण्यात आले. इतकेच नव्हे तर डोक्यावरचे केसही कापण्यात आले, नखे कापली. रात्रभर घाम गाळल्यानंतरही विनेशचे वजन ५० किलोच्या मर्यादेपेक्षा १०० ग्रॅमने जास्त आले. त्यामुळे वजन तपासणीअंति अपात्र ठरवण्यात आले. हा निर्णय ऐकल्यानंतर निर्जलीकरणामुळे विनेश जागीच जमिनीवर कोसळली, त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी संध्याकाळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा आणि माजी ॲॅथलिट पी. टी. उषा यांनी भेट घेऊन तिला धीर दिला.
मंगळवारी झालेल्या सामन्यांवेळी विनेश फोगाटचे वजन ५० किलोच्या आत होते. पण कुस्तीपटूंना त्यांचे वजन स्पर्धेच्या दोन्ही दिवशी नियंत्रणात ठेवावे लागतं. मंगळवारी रात्री विनेशचे वजन २ किलोंनी अधिक होते. तिने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तिला अपयश आले. वजन कमी करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने ऑलिम्पिकच्या आयोजकांकडे अधिकचा वेळ देण्याची मागणी केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. विनेश अपात्र ठरल्याने देशवासीयांचे स्वप्नही भंगले.
भारतीय पथकाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पर्डीवाला म्हणाले की, “वजन तपासणीआधी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. तिचे वजन खूपच कमी झाले असते तर तिला अशक्तपणा आला असता, त्यामुळे तिच्या स्पर्धेतील सहभागावरही परिणाम झाला असता. त्यामुळे तिच्या शरीरातील उर्जा कायम राहावी, यासाठी आम्ही तिला पहिल्या दिवशीच्या वजनानंतर मोजक्या प्रमाणात पाणी आणि उर्जा वाढवणारे उच्च दर्जाचे अन्न दिले होते. विनेशच्या आहारतज्ज्ञाने मंगळवारी वजन केले, तेव्हा ते १.५ किलोने जास्त होते. त्यानंतर तिने मंगळवारी रात्री वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला.”