नवी दिल्ली : देशांतर्गत क्रिकेट खेळणा-या क्रिकेटपटूंना बीसीसीआय सचिव जय शहा यांनी खुशखबर दिली आहे. पुरेसे मानधन मिळत नसल्याने अनेकजण देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळतात. पण, आता यावर तोडगा किंबहुना या क्रिकेटला प्राधान्य म्हणून बीसीसीआयने नवीन योजना आखल्याचे दिसते. जय शहा यांच्या घोषणेनुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामनावीर आणि मालिकावीरच्या माध्यमातून पैसे दिले जातील.
यापूर्वी केवळ रणजी करंडक आणि दुलीप करंडक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जात होते. पण आता पुरुषांबरोबरच महिला क्रिकेटच्या देशांतर्गत स्पर्धांमध्येही पैसे दिले जाणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले की, “आतापासून बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व महिला आणि ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंटला बक्षीस रक्कम दिली जाईल. सिनियर पुरुष विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली यांनाही स्पर्धेतील सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी बक्षीस रक्कम दिली जाईल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीचे बक्षीस देणे महत्त्वाचे आहे. पुरस्कार संस्कृती लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केला जात आहे. आम्हाला एकत्रितपणे देशातील क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार देणारी संस्कृती वाढवायची आहे.”
दुलीप करंडक ५ सप्टेंबरपासून
भारताचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची सुरुवात दुलीप करंडक स्पर्धेने होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबरपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचेही आयोजन केले जाणार आहे.