
सिंगापूर : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीची आठवी फेरीही अखेर बरोबरीत सुटली. त्यामुळे आठव्या फेरीअखेर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. गुरुवारी आठवी फेरी रंगणार आहे.
२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले. त्यानंतर मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने बरोबरीच पाहायला मिळत आहे. बुधवारी आठव्या फेरीतही तब्बल ४ तास आणि १२ मिनिटानंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. ही फेरी ५१ चालींपर्यंत रंगली. अखेर दोघांना अर्धा गुण बहाल करण्यात आला. आतापर्यंतच्या ८ फेऱ्यांपैकी ६ फेऱ्यांमध्ये दोघांनाही बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामन्याला सुरुवात होते.
जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि जगज्जेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल. दर तीन डावांनंतर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळाच्या विश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. तसेच त्याला नैराश्यालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. भारताकडून आतापर्यंत केवळ विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे यावेळी गुकेशकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.