
कोलकाता : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल १४ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होणार असून उभय संघांतील पहिली लढत कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जवळच असल्याने त्यापूर्वी शमीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत खेळणार असून इंग्लंडचे नेतृत्व अनुभवी जोस बटलर करणार आहे.
३४ वर्षीय शमी नोव्हेंबर २०२३मध्ये एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताकडून अखेरची लढत खेळला होता. शमीने त्या विश्वचषकात अवघ्या ७ सामन्यांत २४ बळी मिळवून भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर पायाच्या घोट्याला झालेली दुखापत आणि त्यावरील शस्त्रक्रियेमुळे शमी जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला. ऑक्टोबरच्या अखेरीस त्याने सय्यद मुश्ताक अली आणि त्यानंतर विजय हजारे स्पर्धेत सहभागी होत तंदुरुस्ती सिद्ध केली. अनेकांनी शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याचे सुचवले. मात्र गुडघ्याला येणारी सूज त्याच्या मार्गात अडथळा ठरली. आता मात्र शमी पुन्हा एकदा नव्या जोमाने पुनरागमनासाठी सज्ज आहे. त्यामुळे शमीचा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत शमीवरच भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल.
दरम्यान, भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची टी-२० मालिका खेळला. यामध्ये भारताने ३-१ असे यश संपादन केले. त्यानंतर एकीकडे कसोटी प्रकारात भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र टी-२०मध्ये मुंबईकर सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. जुलैमध्ये श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात ३-० अशी धूळ चारल्यानंतर भारताने मायदेशात बांगलादेशवर ३-० असे वर्चस्व गाजवले. मग आफ्रिकेविरुद्धही मालिका जिंकली. आता इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची मालिका जिंकण्याचेही भारतापुढे लक्ष्य असेल.
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होईल. तसेच टी-२० मालिकेनंतर ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे या मालिकेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीची काळजी घेण्याचेही प्रशिक्षक गौतम गंभीरपुढे आव्हान असेल. ईडन गार्डन्सवर धावांची नेहमीच उधळण झाली असून येथे दवाचा घटक निर्णायक भूमिका बजावतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार असून चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
कोलकाताची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकते. येथे धावांचा पाठलाग करणारा संघ अधिक यशस्वी ठरतो. सामन्याच्या दिवशी पावसाची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे चाहत्यांना दर्जेदार लढत पाहायला मिळेल.
बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांवर दडपण
जसप्रीत बुमरा पाठदुखीमुळे या मालिकेस मुकणार असून तो थेट चॅम्पियन्स ट्रॉफीतच खेळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुनरागमन करणारा शमी आणि डावखुरा अर्शदीप सिंग यांना वेगवान माऱ्याची बाजू सांभाळावी लागेल. विशेषत: अर्शदीप गेल्या काही वर्षांत टी-२०मध्ये भारतासाठी सातत्याने छाप पाडत आहे. फिरकीत भारताकडे सुंदर, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती असे दमदार त्रिकुट उपलब्ध आहे. तसेच अक्षरच्या डावखुऱ्या फिरकीचा पर्याय आहेच. अशा स्थितीत हर्षित राणाला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसते.
सूर्यकुमार, तिलकवर भिस्त
आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन शतके झळकावणाऱ्या संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या फलंदाजांवर चाहत्यांच्या नजरा असतील. तसेच सूर्यकुमारही लय मिळवण्यास आतुर असेल. विजय हजारे स्पर्धेतील ५ सामन्यांत सूर्यकुमारला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतसुद्धा तो चाचपडत होता. डावखुरा फिरकी अष्टपैलू अक्षर पटलेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले असून त्याच्याकडून दुहेरी योगदान अपेक्षित आहे. रिंकू सिंग, हार्दिक पंड्या हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. सॅमसनच्या साथीने अभिषेक शर्मा सलामीला येणार असून वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी असे पर्यायही भारताच्या ताफ्यात आहेत.
बटलर-मॅक्युलम पर्वाचा इंग्लंडमध्ये प्रारंभ
२०२४च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताकडून पराभव पत्करल्यानंतर मॅथ्यू मॉट्स यांनी इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कसोटीचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमच आता टी-२० व एकदिवसीय संघालाही मार्गदर्शन करेल. या मालिकेपासून इंग्लंडमध्ये मॅक्युलम-बटलर पर्वाचा प्रारंभ होईल. सॅम करन, विल जॅक्स या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडने यावेळी युवा खेळाडूंवर विश्वास दर्शवला आहे. जेकब बिथेल, फिल सॉल्ट, बेन डकेट हे प्रथमच भारतात टी-२० सामने खेळणार आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरचे पुनरागमन त्यांच्यासाठी मोलाचे ठरेल. फिरकीपटू आदिल रशिद इंग्लंडसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २४ टी-२० सामन्यांपैकी भारताने १३, तर इंग्लंडने ११ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे. तसेच उभय संघांत २०२२मध्ये अखेरची टी-२० मालिका झाली. त्यामध्ये भारताने २-१ असे यश संपादन केले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
इंग्लंड (अंतिम ११) : जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बिथेल, जेमी ओव्हर्टन, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, मार्क वूड.
वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि हॉटस्टार ॲप