पॅरिस : देशासाठी रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरलो असलो, तरी मी माझ्या कामगिरीसह समाधानी नाही. दुखापतीचे भय आणि धावण्यासह तंत्रातील त्रुटींमुळे मला अपेक्षित भालाफेक करता आली नाही, असे स्पष्टीकरण भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी व्यक्त केली.
२६ वर्षीय नीरजकडून यंदा देशाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र नीरजला ८९.४५ मीटरच्या भालाफेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या विक्रमी भालाफेकीसह सुवर्ण काबिज केले. मुख्य म्हणजे नीरजने सहापैकी पाच प्रयत्नांमध्ये फाऊल केला. स्नायूंच्या दुखापतीतून नुकताच सावरल्याने अंतिम फेरीत भालाफेक करताना तो सातत्याने दडपणाखाली होता. त्याची देहबोलीसुद्धा तेच दर्शवत होती.
“भारतासाठी सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे नक्कीच अभिमानास्पद आहे. मात्र मी माझ्या कामगिरीवर नाखूश आहे. चाहत्यांना माझ्याकडून सुवर्ण अपेक्षित होते. माझी धावण्याची गती व भाला फेकण्याचे तंत्र यामध्ये अंतिम फेरीत गडबड जाणवली,” असे नीरज म्हणाला. नीरजला अद्याप एकदाही ९० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करता आलेली नाही.
“आशियाई स्पर्धेत ८८ मीटरचे अंतर गाठल्यावर मला ऑलिम्पिकमध्ये ९० मीटरचे लक्ष्य गाठायचे होते. मात्र त्यात मी अपयशी ठरलो. जोपर्यंत हे लक्ष्य मी साध्य करणार नाही, तोपर्यंत मला समाधान लाभणार नाही. स्वत:च्या तंदुरुस्तीवर लक्ष देण्यासह भविष्यातील स्पर्धांचा योग्य विचार करून मी कामगिरीत सुधारणा करेन,” असेही नीरजने नमूद केले.
दरम्यान, नीरजने भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील पाचवे पदक पटकावले. यंदा नेमबाजीत भारताने तीन, हॉकीत एक पदक जिंकले. तसेच नीरज हा सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
नीरज माझ्या मुलासारखा; नदीमच्या आईकडून कौतुक
नीरजची आई सरोज देवी आणि नदीमची आई रझिया परवीन यांनी शुक्रवारी एकमेकांच्या मुलांवर कौतुकाची उधळण करून सर्वांची मनं जिंकली. “आम्ही रौप्यपदकासह आनंदी आहोत. ज्याने सुवर्ण जिंकले, तोसुद्धा माझ्याच मुलासारखा आहे. सर्व भालाफेकपटूंनी अफाट मेहनत घेतली,” असे नीरजची आई सरोज म्हणाली, तर पाकिस्तानमधील खानेवाल येथे नदीमच्या आईनेसुद्धा नीरजचे कौतुक केले. “नीरज व नदीम फक्त मित्र नाहीत, तर दोन सख्ख्या भावांसारखे आहेत. मी नीरजच्या भविष्यातील यशासाठी प्रार्थना करते. तो मला माझ्या मुलासारखाच आहे,” असे परवीन म्हणाल्या.
लवकरच शस्त्रक्रिया करणार!
नीरजला मांडीतील स्नायूंच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचे आदेश २०२३मध्येच देण्यात आले होते. मात्र त्यानंतर किमान ३-४ महिने तो सराव करू शकला नसता. त्यामुळे नीरजने शस्त्रक्रिया करण्याचे टाळले. ऑलिम्पिकमध्येही तो दुखापतीचे भय बाळगूनच खेळला. आता लवकरच तो शस्त्रक्रिया करणार असल्याचे समजते.
> ८९.४५- मीटर भालाफेक
> नीरज व नदीम यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १० वेळा आमनेसामने आले होते. त्यापैकी प्रत्येक वेळी नीरजने बाजी मारली. मात्र यंदा ११व्या प्रयत्नात नदीमने सरशी साधली.
नीरजच्या मैत्रीद्वारे युवकांना प्रेरणा : नदीम
नीरज आणि माझ्यात फक्त ट्रॅकवर स्पर्धा असते. मात्र आम्ही दोघे मैदानापलीकडे फार चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांतील ही मैत्री तसेच स्पर्धा भारत-पाकिस्तानमधील युवकांसाठी प्रेरणा ठरू शकते, अशा शब्दांत पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीमने त्याचे मत मांडले. “मी २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ९० मीटरचे अंतर गाठले होते. यंदा मला फारसा सराव करण्याची संधी लाभली नाही. मात्र नीरजशी मी सातत्याने भालाफेकीविषयी चर्चा करत असतो. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर आले की वेगळेच वैर निर्माण होते. मात्र आमच्यात तसे नाही. आम्हा दोघांचेही लक्ष्य आपापल्या देशात भालाफेकीचा प्रसार करण्यासह युवकांना प्रेरित करण्याचे आहे,” असे नदीम म्हणाला. नदीमच्या कामगिरीमुळे १९८८नंतर प्रथमच पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.