जागतिक बुद्धिबळ लढत : पहिला डाव बरोबरीत

भारताचा गतविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेशने फिडे विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच डावात उझबेकिस्तानच्या आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्हला बरोबरीत रोखले. जिनिव्हा येथे मंगळवारी झालेला पहिला डाव अनिर्णित राहिल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला.
जागतिक बुद्धिबळ लढत : पहिला डाव बरोबरीत
जागतिक बुद्धिबळ लढत : पहिला डाव बरोबरीत
Published on: 

जिनिव्हा : भारताचा गतविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेशने फिडे विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच डावात उझबेकिस्तानच्या आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्हला बरोबरीत रोखले. जिनिव्हा येथे मंगळवारी झालेला पहिला डाव अनिर्णित राहिल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला.

काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गुकेशने सुरुवातीला काहीसा सावध पवित्रा घेतला होता. मात्र, वेळेचे बंधन असतानाही त्याने अचूक चालींची गणिते मांडत आपली पकड कायम ठेवली. विशेषतः घड्याळावर वेळ कमी असताना गुकेशने दाखवलेली एकाग्रता आणि गणनक्षमता उल्लेखनीय ठरली. पहिल्याच डावात दोन्ही खेळाडूंमध्ये रणनीतीचा खेळ पाहायला मिळाला. रुई लोपेझ ओपनिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी गुकेशने अनपेक्षितपणे बर्लिन डिफेन्सचा पर्याय निवडला. सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय खेळाडूवर काहीसा दबाव होता. मात्र, वजीर नसलेल्या मध्यावस्थेत त्याने चतुर चाली करत आपली स्थिती मजबूत ठेवली.

काही काळ सिंदारोव्हला अधिक चांगल्या स्थितीत असलेल्या मोहऱ्यांमुळे आणि प्याद्यांच्या रचनेमुळे किंचित आघाडी मिळाली होती. त्यानंतर त्याने प्याद्याचा त्याग करून डाव अधिक गुंतागुंतीचा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळ कमी होत असतानाही गुकेशने योग्य चाली शोधत प्रतिस्पर्ध्याचे आव्हान परतवून लावले. एका क्षणी गुकेश सामन्यावर वर्चस्व मिळवेल असे वाटत होते. मात्र, सिंदारोव्हनेही संयम राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. अखेर दोन्ही खेळाडूंनी एकाच स्थितीची तब्बल पाच वेळा पुनरावृत्ती केल्यानंतर डाव बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)