अर्जेंटिनाची पुन्हा संघर्षानंतर सरशी; अल्वारेझच्या जादुई गोलमुळे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक; स्वित्झर्लंडचा स्वप्नभंग

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनाने रविवारी आणखी एका थरारक लढतीत संघर्षानंतर विजय मिळवला. अतिरिक्त वेळेपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली. ज्युलियन अल्वारेझने केलेला जादुई गोल अर्जेंटिनाच्या विजयात निर्णायक ठरला.
FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाची पुन्हा संघर्षानंतर सरशी; अल्वारेझच्या जादुई गोलमुळे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक; स्वित्झर्लंडचा स्वप्नभंग
FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाची पुन्हा संघर्षानंतर सरशी; अल्वारेझच्या जादुई गोलमुळे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक; स्वित्झर्लंडचा स्वप्नभंगX
Published on

कान्सास सिटी : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनाने रविवारी आणखी एका थरारक लढतीत संघर्षानंतर विजय मिळवला. अतिरिक्त वेळेपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली. ज्युलियन अल्वारेझने केलेला जादुई गोल अर्जेंटिनाच्या विजयात निर्णायक ठरला. याबरोबरच अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली, तर स्वित्झर्लंडचे प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.

कान्सास सिटी स्टेडियमवर ६९ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत ९०व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांत १-१ अशी बरोबरी होती. तसेच स्वित्झर्लंडचा आक्रमक ब्रील एम्बोलोला ७२व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आल्याने त्यांनी उर्वरित वेळेत १० खेळाडूंसह अर्जेंटिनाचा मुकाबला केला. अखेरीस अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला स्वित्झर्लंडचा बचाव भेदण्यात यश आले. मुख्य म्हणजे तारांकित लिओनेल मेस्सीने या लढतीत एकही गोल न करता अर्जेंटिनाने बाजी मारून दाखवली. अर्जेंटिनाने एकंदर सहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता गुरुवार, १६ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. १९७८, १९८६ व २०२२च्या विजेत्या अर्जेंटिनाला यंदा चौथे विश्वविजेतेपद खुणावत आहे.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. पुढील रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याची आता सर्वांना चाहुल लागली असून त्यापूर्वी बुधवार, १५ जुलै रोजी फ्रान्स विरुद्ध स्पेन यांच्यातील उपांत्य सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणेदेखील रंजक ठरेल.

दरम्यान, उभय संघांतील या लढतीत १०व्या मिनिटालच मॅक ॲलिस्टरने मेस्सीच्या कॉर्नरवर हेडर लगावून अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटिनाने बचावात्मक पवित्रा अवलंबला. अखेरीस एन्डोएने ६७व्या मिनिटाला गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझच्या पायातून चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत स्वित्झर्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेमध्ये ही बरोबरी कायम राहिली. ८९व्या मिनिटाला ॲलिस्टर व भरपाई वेळेत मेस्सीची गोल करण्याची संधी हुकली.

अतिरिक्त वेळेत म्हणजेच पुढच्या ३० मिनिटांत मग अर्जेंटिनाने आक्रमणावर भर दिला. अखेर ११२व्या मिनिटाला लोपेझच्या पासवर बॉक्सच्या कोपऱ्यातून अल्वारेझने अफलातून किक लगावली व अर्जेंटिनाने दुसरा गोल नोंदवला. हा त्याचा स्पर्धेतील पहिलाच गोल असून याची स्पर्धेतील सर्वोत्तम गोल म्हणूनही निवड केली जाऊ शकते. मग १२०व्या मिनिटाला अल्माडाचा प्रयत्न गोलरक्षकाने थोपवल्यावर जवळच असलेल्या मार्टिनेझने संधी साधून संघाच्या ३-१ अशा विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

अर्जेंटिनाने विश्वचषकातील सलग १२ सामन्यांत किमान २ किंवा त्याहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला. त्यांनी उरुग्वेचा ७४ वर्षांपूर्वीचा ११ सामन्यांचा विक्रम मोडला. अर्जेंटिनाने २०२२च्या विश्वचषकात मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपासून या विक्रमाची सुरुवात केली आहे.

अर्जेंटिना यापूर्वी पाच वेळा विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला असून ते कधीही उपांत्य फेरीत पराभूत झालेले नाहीत. १९३०, १९८६, १९९०, २०१४, २०२२ या वर्षीच्या विश्वचषकात त्यांनी अशी कामगिरी नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.

अर्जेंटिना संघ विश्वचषकात भरपाई वेळेपर्यंत किंवा पेनल्टी शूटआऊटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १३ सामने खेळला आहे. यांपैकी ११ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.

एम्बोलोला लाल कार्ड, रेफ्री निशाण्यावर

यानंतर स्वित्झर्लंडचा खेळाडू एम्बोलोला मिळालेल्या रेड कार्डमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. व्हिडिओ असिस्टंट रेफ्री म्हणजेच व्हीएआरद्वारे चुकीची ओळख प्रोटोकॉल वापरून लिअँड्रो परेडेसला मिळालेले पिवळे कार्ड रद्द करण्यात आले आणि एम्बोलोला आधीच एक यलो कार्ड असल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले, ज्यामुळे स्वित्झर्लंडला १० खेळाडूंसह खेळावे लागले. अर्जेंटिनाच्या खेळाडूचा धक्का न लागताही एम्बोलो मैदानावर पडला. त्यामुळे खेळभावना न राखल्याने एम्बोलोला लाल कार्ड दाखवण्यात आले. स्वित्झर्लंडचे मुख्य प्रशिक्षक मुरात याकिन यांनी रेफ्रींच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्या मते हा नियम पूर्णपणे अस्वीकार्य असून अशा प्रकारे स्पर्धेतून बाहेर पडणे अत्यंत वेदनादायक आहे, असे याकिन म्हणाले. स्वित्झर्लंडचा रेमो फ्रायलर याने या लाल कार्डला एक आपत्ती असे संबोधले. स्वित्झर्लंडचा संघ १९५४ नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता, मात्र अर्जेंटिनाविरुद्ध आठ सामन्यांत स्वित्झर्लंडला अद्याप विजय मिळवता आलेला नाही, हे विशेष.

मेस्सी अपयशी ; तरीही विक्रम

विश्वचषकातील सलग नऊ सामन्यांत गोल केल्यानंतर रविवारी अखेरीस १०व्या लढतीत मेस्सीला गोल करण्यात अपयश आले. २०२२च्या विश्वचषकातील राऊंड ऑफ ३२, उपांत्यपूर्व, उपांत्य, अंतिम सामना व २०२६च्या विश्वचषकातील पाच अशा एकूण ९ लढतींमध्ये मेस्सीने किमान एक गोल नोंदवून विश्वविक्रम केला होता. मेस्सीने स्वित्झर्लंडविरुद्ध गोल केला नसला, तरी पहिल्या गोलसाठी सहाय्य (असिस्ट) केले होते. याबरोबरच मेस्सी हा विश्वचषकात सर्वाधिक १० असिस्ट करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने अर्जेंटिनाच्याच दिएगो मॅराडोना यांचा विक्रम मोडीत काढला. तसेच विश्वचषकातील बाद फेरीच्या लढतींचा (नॉकआऊट) विचार केल्यास मेस्सीने किमान १५ गोलमध्ये योगदान (गोल किंवा असिस्ट) दिले आहे. गेल्या ६० वर्षांत एकाही खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in