इजिप्तचा प्रहार, अर्जेंटिनाचा पलटवार; ०-२ अशा पिछाडीवरून गतविजेत्यांची ३-२ने सरशी; मेस्सीची पुन्हा चमकदार कामगिरी

FIFA World Cup 2026 : अर्जेंटिना आणि अविश्वसनीय पुनरागमन यांच्यात जणू वेगळेच नाते आहे. मंगळवारी रात्री फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व सामन्यात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. झुंजार वृत्तीच्या इजिप्तने ७८व्या मिनिटापर्यंत घेतलेली २-० अशी आघाडी मोडीत काढून गतविजेत्या अर्जेंटिनाने पुढील १५ मिनिटांत ३ अफलातून गोल केले.
इजिप्तचा प्रहार, अर्जेंटिनाचा पलटवार; ०-२ अशा पिछाडीवरून गतविजेत्यांची ३-२ने सरशी; मेस्सीची पुन्हा चमकदार कामगिरी
X
Published on

पुअटलांटा : अर्जेंटिना आणि अविश्वसनीय पुनरागमन यांच्यात जणू वेगळेच नाते आहे. मंगळवारी रात्री फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व सामन्यात याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. झुंजार वृत्तीच्या इजिप्तने ७८व्या मिनिटापर्यंत घेतलेली २-० अशी आघाडी मोडीत काढून गतविजेत्या अर्जेंटिनाने पुढील १५ मिनिटांत ३ अफलातून गोल केले. त्यामुळे त्यांनी ३-२ अशी सरशी साधनाता सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर इजिप्तचे प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. १ गोलसह अन्य गोलसाठी सहाय्य करणारा तारांकित लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विजयानंतर सर्व खेळाडूंनी त्याला हवेत उडवून जल्लोष केला.

अटलांटा स्टेडियमवर ६८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत इजिप्तकडून यासिर इब्राहिम (१५वे मिनिट) आणि मोस्ताफा झिको (६७ मि.) यांनी दोन गोल नोंदवले होते. मात्र अर्जेंटिनासाठी ख्रिस्टियन रोमेरो (७९ मि.), मेस्सी (८३ मि.) आणि एंझो फर्नांडेझ (९०+३ मि.) यांनी अखेरच्या १५ मिनिटांत तीन गोल नोंदवून अशक्यप्राय विजय मिळवला. इजिप्तचा एक गोल यावेळी फाऊलमध्ये रद्द करण्यात आला. तसेच अखेरच्या काही मिनिटांत रेफ्रीने अर्जेंटिनाच्या बाजूने काही निर्णय दिल्याची तक्रार इजिप्तचे खेळाडू तसेच प्रशिक्षक करत होते. त्यामुळे काहींना लाल व पिवळे कार्डही दाखवण्यात आले. समाज माध्यमांवरही या लढतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र दडपणाखाली अर्जेंटिनाने पुन्हा एकदा कामगिरी उंचावून टीकाकारांची तोंडे बंद करत थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्जेंटिनाची आता रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत स्वित्झर्लंडशी गाठ पडेल.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला. आता गुरुवार मध्यरात्रीपासून रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

दरम्यान, अर्जेंटिनाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली होती. मात्र राऊंड ऑफ ३२ लढतीत केप व्हर्डेविरुद्ध विजय मिळवताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मंगळवारी रात्री इजिप्तविरुद्ध देखील तसेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळेच या विजयानंतर ३९ वर्षीय मेस्सीच्या डोळ्यात अश्रू आले होते. मेस्सीने या लढतीत सुरुवातीला पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली. तसेच पहिल्या सत्रात त्याचे २ ते ३ प्रयत्न इजिप्तचा गोलरक्षक मुस्ताफा शोबेर याने थोपवले होते. अखेर दुसऱ्या सत्रात मेस्सीने लय मिळवून यंदाच्या विश्वचषकातील आठवा गोल नोंदवला. तसेच त्याची विश्वचषकातील एकूण गोलची संख्या २१ झाली आहे.

या सामन्यात इजिप्तसाठी इब्राहिमने १५व्याच मिनिटाला पहिला गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. मग ६७व्या मिनिटाला झिकोने गोल करत इजिप्तची आघाडी २-० अशी मजबूत केली. यापूर्वी झिकोने केलेला एक गोल व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये फॉउल ठरल्याने नाकारण्यात आला होता. त्यावेळी अर्जेंटिना गारद होणार, असेच वाटत होते. मात्र मेस्सीच्या पासवर रोमेरोने हेडरद्वारे ७९व्या मिनिटाला अफलातून गोल केला. त्वरितच ८३व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा जादू दाखवत संघाला बरोबरी साधून दिली. भरपाई वेळेत लॉटारो मार्टिनेझच्या अफलातून पासवर फर्नांडेझने सुरेख हेडर लगावून अर्जेंटिनाच्या ३-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

मेस्सीने या विश्वचषकात दोन वेळा पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावली. एकूण त्याने विश्वचषकात ८ पैकी ४ वेळा पेनल्टीवर गोल केले आहेत, तर ४ वेळा त्याला गोल करण्यात अपयश आले आहे.

इजिप्तच्या प्रशिक्षकांचा संताप, रेफ्रीवर टीका

पराभवानंतर इजिप्तच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला मोस्तफा झिकोने गोल करून इजिप्तला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. यापूर्वी इजिप्तचा एक गोल व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीने (व्हीएआर) फॉउल ठरवून नाकारण्यात आला होता. सामन्यानंतर मैदानावर मोठा वाद निर्माण झाला.

भरपाई वेळेत एन्झोने अर्जेंटिनासाठी विजयी गोल केला, ज्यावर इजिप्तच्या खेळाडूंनी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. फ्रेंच रेफ्री फ्रँकोइस लेटेक्सियर यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इजिप्तचे गोली कोच साफान एलसाघिर यांना रेड कार्ड दाखवण्यात आले, तर इतर सदस्यांना यलो कार्ड देण्यात आले. इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांनी हाताने 'एक्स' आकार करत वर्णद्वेषी वर्तनाचा इशारा केला आणि फुटबॉल विश्वाला मेस्सी आणि अर्जेंटिनाने पुढे जावे असे वाटत असल्याचा आरोप केला.

“आमच्यावर आज अन्याय झाला आहे,” असे हसन म्हणाले. या विश्वचषकात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफावर प्रभाव टाकल्याच्या आरोपांची आधीच चर्चा असताना आता इजिप्तने थेट फिफावर निशाणा साधला आहे. इजिप्शियन फुटबॉल असोसिएशनने (ईएफए) बुधवारी सकाळी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून रेफ्रींच्या निर्णयांवर आणि व्हीएआर यंत्रणेच्या अपयशावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मेस्सीची सुरुवातीला निराशा, मग पराक्रम

मेस्सीच्या भावूक आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने दोन गोलची पिछाडी भरून काढत इजिप्तचा ३-२ असा पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या ११ मिनिटांत आणि भरपाई वेळेत अर्जेंटिनाने तीन गोल डागत हा चमत्कारिक विजय साकारला. या विजयात मेस्सीने मोलाची भूमिका बजावली. तसेच गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सीने ८ गोलसह पुन्हा अग्रस्थान काबिज केले आहे. त्यामुळे सुरुवातीला पेनल्टीवर गोल करण्याची संधी गमावूनही नंतर भरपाई केली.

मेस्सी हा आमचा आदर्श आणि मार्गदर्शक असून तो प्रत्येक वेळी आम्हाला मदत करतो, असे अर्जेंटिनाचा मार्टिनेझ म्हणाला. हा संघ कधीही हार मानत नाही आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो, असेही तो म्हणाला. यासोबतच त्याने २०२२च्या विश्वचषकापासून सलग नऊ सामन्यांत गोल करण्याचा नवा विक्रम केला आहे. या नऊ सामन्यांत त्याने १३ गोल केले आहेत. या सामन्यापूर्वी मेस्सी, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे आणि नॉर्वेचा एर्लिंग हालँड प्रत्येकी सात गोलसह बरोबरीत होते. एम्बाप्पे दोन असिस्टसह आघाडीवर होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in