

मियामी गार्डन्स : तारांकित लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गतविजेत्या अर्जेंटिना संघापुढे शुक्रवारी मध्यरात्री फिफा विश्वचषकाच्या राऊंड ऑफ ३२ सामन्यात केप व्हर्डेचे आव्हान असेल. या लढतीत अर्जेंटिनाच्या आक्रमणाचा केप व्हर्डेच्या बचावाविरुद्ध कस लागू शकतो.
त्याशिवाय शुक्रवारी रात्री मोहम्मद सलाहच्या इजिप्तची ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल, तर शनिवारी सकाळी कोलंबिया आणि घाना हे दोन चिवट वृत्तीचे संघ आमनेसामने येतील. कोलंबिया-घाना लढतीद्वारे राऊंड ऑफ ३२ फेरी संपेल. शनिवारी रात्रीपासून मग उपउपांत्यपूर्व फेरी (राऊंड ऑफ १६) सुरू होईल.
१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी ३२ संघांनी बाद फेरी गाठल्यावर आता प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येत आहे, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.
दरम्यान, अर्जेंटिनाने आय-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले. त्यांनी अनुक्रमे अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन यांना धूळ चारली. अर्जेंटिनाने ३ सामन्यांत ९ गोल केले असून त्यांपैकी ६ गोल मेस्सीच्या नावावर आहेत. त्यामुळे मेस्सी यंदाच्या विश्वचषकात गोल्डन बूटच्या शर्यतीत फ्रान्सच्या किलियान एम्बाप्पेसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. तसेच विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेस्सी १९ गोलसह अग्रस्थानी असून एम्बाप्पे १८ गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत मेस्सीला आघाडी घेण्याची संधी आहे. मेस्सीला ज्युलियन अल्वारेझ, मॅक अॅलिस्टर, लॉटारो मार्टिनेझ यांची चांगली साथ लाभत आहे.
मात्र अर्जेंटिनापुढील आव्हान सोपे नसेल. कारण केप व्हर्डेने साखळी फेरीत स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले, तर उरुग्वेलाही २-२ असे बरोबरीत रोखून एच-गटातून दुसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली. त्यांचा ४० वर्षीय गोलरक्षक वोझिन्हा पुन्हा एकदा छाप पाडण्यास सज्ज आहे. त्यामुळे अवघी २.५ लाख लोकसंख्या असलेला केप व्हर्डे संघ अर्जेंटिनाला धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत मेस्सी आणि एम्बाप्पे प्रत्येकी सहा गोलसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहेत. मेस्सीने ३ सामन्यांत ६, तर एम्बाप्पेने ४ सामन्यांत ६ गोल केले आहेत.
क्रिकेटपटू यशस्वी अर्जेंटिनाचा चाहता
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल बुधवारी फ्रान्स विरुद्ध स्वीडन लढत पाहण्यासाठी अमेरिकेतील मेटलाईफ स्टेडियमवर उपस्थित होता. मात्र यावेळी यशस्वी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. त्याने मेस्सीचे नाव असलेली अर्जेंटिनाची जर्सी परिधान केली होती. राजस्थान रॉयल्स संघाने यशस्वीचा फोटो ट्वीट करून याविषयी माहिती दिली. त्यामुळे सामना कोणताही असला, तरी यशस्वीने आपण अर्जेंटिनाचे चाहते आहोत, हे दाखवून दिले.
आजचे सामने
इजिप्त वि. ऑस्ट्रेलिया (रात्री ११.३० वाजता)
अर्जेंटिना वि. केप व्हर्डे (मध्यरात्री ३.३० वाजता)
कोलंबिया वि. घाना (शनिवारी सकाळी ७ वाजता)
थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप