

अटलांटा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी १२.३० वाजता) होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अटलांटा स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनापुढे हॅरी केनच्या इंग्लंडचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे आरपारच्या लढाईत सरशी साधून कोण अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल टाकणार, हे पाहणे रंजक ठरेल.
फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. पुढील रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याची आता सर्वांना चाहुल लागली असून त्यापूर्वी उपांत्य सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, गतविजेत्या अर्जेंटिनाने साखळीत सलग तीन विजय मिळवताना अनुक्रमे अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन यांना धूळ चारली. त्यानंतर राऊंड ऑफ ३२ लढतीत केप व्हर्डे व उपउपांत्यपूर्व लढतीत इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाने अनुक्रमे ३-२ असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत त्यांनी स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली. अर्जेंटिना गेल्या काही सामन्यांत किमान २ ते ३ गोल करत असली, तरी त्यांचा बचाव फिका पडत असल्याने ते १-२ गोल स्वीकारत देखील आहेत. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध अर्जेंटिनाच्या बचावफळीचा कस लागेल. अर्जेंटिनाच्या लढतीत रेफ्रींकडून देण्यात येणाऱ्या काही निर्णयांची चर्चाही सुरूच आहे.
अर्जेंटिनाने विश्वचषकातील सलग १२ सामन्यांत किमान २ किंवा त्याहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी उरुग्वेचा ७४ वर्षांपूर्वीचा ११ सामन्यांचा विक्रम मोडला. अर्जेंटिनाने २०२२च्या विश्वचषकात मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपासून या विक्रमाची सुरुवात केली आहे. तसेच अर्जेंटिना संघ विश्वचषकात भरपाई वेळेपर्यंत किंवा पेनल्टी शूटआऊटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १३ सामने खेळला आहे. यांपैकी ११ लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. गेल्या काही दिवसांत अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागला आहे.
दुसरीकडे १९६६च्या विजेत्या इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया व पनामाला धूळ चारली, तर घानाविरुद्ध बरोबरी पत्करली. मग बाद फेरीत इंग्लंडने आक्रमणाची धार वाढवली. काँगोविरुद्ध २-१, तर मेक्सिकोविरुद्ध त्यांनी ३-२ अशी सरशी साधली. मग उपांत्यपूर्व फेरीत हालँडच्या नॉर्वेला २-१ असे नमवून एकंदर चौथ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. २०१८ व १९९०मध्ये इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता मात्र ते ५० वर्षांनी अंतिम फेरी गाठण्यास आतुर असतील.
एकूणच आता दुसऱ्या उपांत्य फेरीची सर्वांना उत्सुकता असून या लढतीतील विजेता फ्रान्स किंवा स्पेनविरुद्ध अंतिम लढतीत खेळेल. लिओनेल स्कलोनी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक आहेत, तर थॉमस टुशेल इंग्लंडचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. अर्जेंटिनाने १९८६मध्ये उपांत्यपूर्व फेरीत दिएगो मॅराडोनाच्या ‘हँड ऑफ गॉड’ गोलद्वारे इंग्लंडला पराभूत केले होते. त्या पराभवाचे शल्य इंग्लंडच्या चाहत्यांच्या मनात आजही कायम असेल. त्यामुळे आता इंग्लंड त्या पराभवाची सव्याज परतफेड करणार की अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणार, याची जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे.
अर्जेंटिनाने एकंदर सहाव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. मुख्य म्हणजे अर्जेंटिना आजवर एकदाही उपांत्य फेरीत पराभूत झालेली नाही. १९७८मध्ये उपांत्य फेरी झाली नव्हती. गटातील विजेत्याच्या नियमाद्वारे अर्जेंटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
इंग्लंडने एकंदर चौथ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यांना फक्त एकदाच अंतिम फेरी गाठता आलेली आहे. १९६६मध्ये त्यांनी विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर आता ६० वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे इंग्लंडचे ध्येय आहे.
आमनेसामने
उभय संघांत आतापर्यंत १४ सामने झाले असून इंग्लंडने ६, तर अर्जेंटिनाने ३ लढती जिंकल्या आहेत. उर्वरित पाच सामने बरोबरीत सुटले आहेत.
फिफा विश्वचषकात अर्जेंटिना-इंग्लंड सहाव्यांदा आमनेसामने येतील. यापूर्वीच्या पाच लढतींपैकी ३ वेळा इंग्लंडने, तर २ वेळा अर्जेंटिनाने विजय मिळवला आहे.
‘हँड ऑफ गॉड’च्या आठवणींना उजाळा
१९८६मध्ये विश्वचषकात इंग्लंड व अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. त्यावेळी अर्जेंटिनाने २-१ अशी बाजी मारली. मात्र या लढतीतील पहिल्या गोलसाठी दिएगो मॅराडोना यांनी हेडरऐवजी हाताचा वापर करून गोल केला होता. त्यावेळी हा गोल देण्यात आल्याने वाद निर्माण झाले होते. रेफ्रींपैकी एकाच्याही नजरेत त्यावेळी मॅराडोनाने डावा हात वापरल्याचे आले नाही. काही वर्षांनी मॅराडोना यांनी त्या गोलमध्ये आपण हाताचा वापर केल्याचे म्हटले. मॅराडोना यांना फुटबॉल विश्वात त्यावेळी देवाप्रमाणेच मानले जायचे. त्यामुळे त्या गोलला ‘हँड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. ४० वर्षांपूर्वीच्या त्या पराभवाच्या आठवणी आजही इंग्लंडला सतावत आहेत. तसेच त्यावेळी अर्जेंटिनाने निळ्या गडद रंगाचीच जर्सी परिधान केली होती. आता उपांत्य सामन्यातदेखील अर्जेंटिना ‘अवे’ जर्सीमध्ये मैदानात उतरेल.
मेस्सीवर भिस्त; दीबूकडून अपेक्षा
अर्जेंटिनाच्या संघाची भिस्त पुन्हा एकदा तारांकित मेस्सीवर असेल. ३९ वर्षीय मेस्सीने अर्जेंटिनासाठी सर्वाधिक ८ गोल केले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. स्वित्झर्लंडविरुद्ध मेस्सीला गोल करता आला नाही. मात्र किमान १० लढतींमध्ये त्याने गोल किंवा गोलसाठी सहाय्य (असिस्ट) केले आहे. याबरोबरच मेस्सी हा विश्वचषकात सर्वाधिक १० असिस्ट करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने अर्जेंटिनाच्याच दिएगो मॅराडोना यांचा विक्रम मोडीत काढला. तसेच विश्वचषकातील बाद फेरीच्या लढतींचा (नॉकआऊट) विचार केल्यास मेस्सीने किमान १५ गोलमध्ये योगदान (गोल किंवा असिस्ट) दिले आहे. गेल्या ६० वर्षांत एकाही खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाही. त्याशिवाय ज्युलियन अल्वारेझ, लॉटारो मार्टिनेझ, एंझो फर्नांडेझ यांच्याकडून मेस्सीला सहाय्य अपेक्षित आहे. अल्वारेझने स्वित्झर्लंडविरुद्ध नेत्रदीपक गोल केला होता. लिसांड्रोही लयीत आहे. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ अर्थात दीबूला मात्र अद्याप छाप पाडता आलेली नाही. २०२२च्या विश्वचषकात त्याने दोन वेळा पेनल्टी शूटआऊटमध्ये कमाल केली होती. आता उपांत्य फेरीत तशी वेळ ओढवली, तर दीबूकडून अर्जेंटिनाच्या चाहत्यांना सुधारणा अपेक्षित असेल.
केन, बेलिंघम इंग्लंडचे तारणहार
इंग्लंडचा कर्णधार केनने या विश्वचषकात ६ गोल नोंदवले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. कारण इंग्लंडचाच मध्यरक्षक ज्यूड बेलिंघमनेदेखील ६ गोल नोंदवले आहेत. मुख्य म्हणजे केनच्या तुलनेत निर्णायक वेळी बेलिंघम कामगिरी उंचावत आहे. रेयाल माद्रिदकडून खेळणारा बेलिंघम यंदा बॅलन डी’ऑरच्या शर्यतीतही आहे. इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत केनने ११ गोलसह अग्रस्थान मिळवले आहे. तसेच यंदा वर्षभरात त्याने बायर्न म्युनिक क्लबकडून खेळतानाही छाप पाडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या बचावपटूंविरुद्ध केन कोणता करिष्मा करणार, यावर इंग्लंडचे भवितव्य अवलंबून असेल. इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डसुद्धा लयीत आहे. बचावात इंग्लंडला सुधारणेला वाव आहे. बुकायो साका, मार्कस रशफोड, डेक्लान राईस यांच्यावर इंग्लंडच्या बचावासह मधल्या फळीची मदार असेल.
अर्जेंटिना वि. इंग्लंड
स्थळ : अटलांटा स्टेडियम, अटलांटा
वेळ : मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून (गुरुवार)
थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप