FIFA World Cup 2026 : बेल्जियमच बाजीगर! ०-२ अशा पिछाडीवरून सेनेगलवर सरशी; कर्णधार टिलेमन्स तारणहार

‘गोल्डन जनरेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेल्जियमने गुरुवारी यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच लौकिकाला साजेसा खेळ केला.
FIFA World Cup 2026 : बेल्जियमच बाजीगर! ०-२ अशा पिछाडीवरून सेनेगलवर सरशी; कर्णधार टिलेमन्स तारणहार
FIFA World Cup 2026 : बेल्जियमच बाजीगर! ०-२ अशा पिछाडीवरून सेनेगलवर सरशी; कर्णधार टिलेमन्स तारणहार(Photo-X/@ani_digital)
Published on

सीएटल : ‘गोल्डन जनरेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेल्जियमने गुरुवारी यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच लौकिकाला साजेसा खेळ केला. तब्बल ८६व्या मिनिटापर्यंत ०-२ अशा पिछाडीवर असताना कर्णधार युरी टिलेमन्सने केलेल्या दोन गोलच्या बळावर बेल्जियमने अतिरिक्त वेळेपर्यंत रंगलेल्या (एक्स्ट्रा टाइम) बाद फेरीच्या (राऊंड ऑफ ३२) लढतीत झुंजार वृत्तीच्या सेनेगलवर ३-२ अशी मात केली. याबरोबरच बेल्जियमने ८ वर्षांनी विश्वचषकाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली, तर सेनेगलचे स्वप्न मात्र उद्ध्वस्त झाले.

सामन्याची नियमित वेळ संपण्यास केवळ ५ मिनिटे शिल्लक असताना सेनेगलकडे २-० अशी भक्कम आघाडी होती. मात्र रोमेलू लुकाकू आणि टिलेमन्स यांनी अनुक्रमे ८६ व ८९व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे हा सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. त्यानंतर १२५व्या मिनिटाला टिलेमन्सने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत बेल्जियमचा विजय पक्का केला. टिलेमन्सचा हा गोल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात उशिरा झालेला गोल ठरला आहे. त्यामुळे जवळपास ६ ते ७ वर्षे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या बेल्जियमने आगेकूच केली. आता त्यांच्यासमोर मंगळवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात यजमान अमेरिकेचे आव्हान असेल.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी ३२ संघांनी बाद फेरी गाठल्यावर आता प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येत आहे, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, सीएटल स्टेडियमवर ६६ हजार चाहत्यांच्या साक्षीने झालेल्या बेल्जियम विरुद्ध सेनेगल यांच्यातील राऊंड ऑफ ३२ लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आफ्रिकेतील सेनेगल यावेळी युरोपातील बेल्जियमला कडवी झुंज देणार, हे अपेक्षित होते. सेनेगलने त्यानुसारच खेळ करताना २४व्या मिनिटाला हबिब डायराच्या गोलमुळे १-० अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात ५१व्या मिनिटाला इस्माइला सारने आणखी एक गोल नोंदवून सेनेगलची आघाडी २-० अशी वाढवली.

त्यानंतर ८५व्या मिनिटांपर्यंत सेनेगलने ही आघाडी टिकवून ठेवली होती. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ३३ वर्षीय अनुभवी लुकाकूने मात्र यावेळी बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदवला. तर ८९व्या मिनिटाला ट्रोसार्डच्या पासवर टिलेमन्सने हेडर लगावून बेल्जियमला बरोबरी साधून दिली. मग सामना अतिरिक्त वेळेपर्यंत लांबला. तेथे अखेरच्या मिनिटाला टिलेमन्सला बॉक्समध्ये पाडण्यात आल्याने बेल्जियमला पेनल्टी मिळाली. टेलिमन्सने गोलजाळ्याच्या कॉर्नरमध्ये अफलातून किक लगावून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

२०२२मध्ये बेल्जियमला साखळीतच गारद व्हावे लागले होते. तर २०१८मध्ये रशिया येथील विश्वचषकात त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आता लुकाकू, टिलेमन्स, डीब्रुएने यांच्या बळावर हा संघ कुठवर झेप घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

पेनल्टी देण्यावरून वाद

सामन्याचे काही सेकंद शिल्लक असताना पेनल्टी शूटआऊटची शक्यता निर्माण झाली होती, तेव्हा टिलेमन्सला पाडण्यात आले. व्हिडिओ रिव्ह्यूनंतर पंचांनी पेनल्टी बहाल केली, ज्यावर सेनेगलच्या संघाने तीव्र आक्षेप घेतला. या निर्णयावर सेनेगलचे मुख्य प्रशिक्षक पेप थियाव यांनी भाष्य करण्यास नकार दिला. आम्हा सर्वांचे पेनल्टीबाबत वेगवेगळे अर्थ असू शकतात, त्यामुळे मी पंचांच्या निर्णयावर कोणतीही टिप्पणी करणार नाही, असे थियाव म्हणाले. टिलेमन्सने चेंडूला स्पर्श केल्यानंतर सेनेगलच्या खेळाडूचा पाय त्याच्या मार्गात आल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काही जण बेल्जियमसह पंचांचा बचाव करताना टेलिमन्सने चेंडूला किक लगावण्यापूर्वीच बचावपटूने त्याला पाडल्याचे मत व्यक्त करत आहेत.

टिलेमन्सने अतिरिक्त वेळेत १२५व्या मिनिटाला नोंदवलेला गोल हा विश्वचषकातील सर्वात उशिरा झालेला गोल ठरला. टिलेमन्सला ११६व्या मिनिटालाच बॉक्समध्ये पाडण्यात आले. मात्र ‘वीएआर’द्वारे निर्णयाची पडताळणी करण्यासाठी जवळपास ७ ते ८ मिनिटे वेळ गेल्याने त्याने १२५व्या मिनिटाला पेनल्टी किक लगावली. बेल्जियमने दुसऱ्यांदा विश्वचषकातील लढतीत ०-२ अशा पिछाडीवर असताना विजय मिळवला. यापूर्वी २०१८मध्ये जपानविरुद्ध उपउपांत्यपूर्व लढतीतही बेल्जियमने अशाचप्रकारे ३-२ अशी सरशी साधली होती.

गोलफलक

  • बेल्जियम (३) - सेनेगल (२)

  • लुकाकू (८६ मि.) - डायरा (२४ मि.)

  • टिलेमन्स (८९, १२०+५ मि.) - सार (५१ मि.)

या ऐतिहासिक पुनरागमनाचा भाग असणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. दडपणाच्या स्थितीत संघाला विजय मिळवून देणारे दोन गोल करणे गौरवास्पद बाब आहे.

- युरी टिलेमन्स

logo
marathi.freepressjournal.in