

व्हॅकुव्हर (एपी): विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर अखेर बेल्जियमने फॉर्म मिळवत न्यूझीलंडचा ५-१ ने पराभव केला आहे. या विजयासह बेल्जियमने 'जी' गटात अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला आहे.
पराभूत झाल्यामुळे न्यूझीलंडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बेल्जियमला बाद फेरीचा पहिला सामना ३ जुलै रोजी सिएटल येथे खेळावा लागणार आहे.
सामन्याच्या २८ व्या मिनिटाला लिअँड्रो ट्रॉसार्डने गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमचा हा स्पर्धेतील पहिला अधिकृत गोल ठरला. यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ट्रॉसार्डने स्वतःचा दुसरा गोल नोंदवला. ६६ व्या मिनिटाला केविन डी ब्रुइने याने पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून उत्कृष्ट गोल करत बेल्जियमची आघाडी मजबूत केली. ८४ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या एलिजा जस्टने एक गोल करत खाते उघडले, मात्र दोन मिनिटांनंतर रोमेलू लुकाकूने हेडरद्वारे गोल करत बेल्जियमला ४-१ ने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत (स्टॉपेज टाइम) अॅलेक्स सालेमेकर्सने गोल करत बेल्जियमचा ५-१ ने विजय निश्चित केला.
या विजयामुळे बेल्जियमचे सात गुण झाले आहेत. इजिप्त आणि इराण यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत सुटल्याचा फायदाही बेल्जियमला मिळाला. बेल्जियमचे प्रशिक्षक रुडी गार्सिया यांनी सांगितले की, "बाद फेरीचा सामना जिंकण्यावर आता आमचे लक्ष आहे. गोलकीपर थिबाउट कोर्दुआने या सामन्यात मैदानात उतरून बेल्जियमसाठी विश्वचषकातील सर्वाधिक १८ सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला."