FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष; मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवली

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलला रविवारी सलामीलाच प्रचंड संघर्ष करावा लागला. क-गटातील लढतीत झुंजार वृत्तीच्या मोरोक्कोने ब्राझीलला १-१ अशा बरोबरीत रोखले.
ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष; मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवली
ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष; मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवलीPhoto : X
Published on

ईस्ट रदरफोर्ड : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलला रविवारी सलामीलाच प्रचंड संघर्ष करावा लागला. क-गटातील लढतीत झुंजार वृत्तीच्या मोरोक्कोने ब्राझीलला १-१ अशा बरोबरीत रोखले. ईस्माइल सैबारीने २१व्या मिनिटाला मोरोक्कोकडून गोल केल्यानंतर ३२व्या मिनिटाला व्हिनिशियस ज्युनियरने ब्राझीलला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर मोरोक्कोच्या बचावाने ब्राझीलचे आक्रमण थोपवले. अनुभवी आक्रमणपटू नेयमारची अनुपस्थितीत ब्राझीलला प्रकर्षाने जाणवली.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. क्रीडाविश्वातील सर्वात मोठा सोहळा म्हणूनही फुटबॉल विश्वचषकाची चाहते चार वर्षे आवर्जून वाट पाहत असतात. १२ जून ते २० जुलै या कालावधीत अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. १९३०मध्ये पहिला विश्वचषक पार पडला. तेव्हापासून आजवर कधीच सहभागी संघांची सख्या ३२च्या पुढे गेली नव्हती. यंदा १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, क-गटात ब्राझीलने रविवारी आपल्या अभियानास प्रारंभ केला. नेयमार पायाच्या दुखापतीमुळे या लढतीस मुकला. त्यामुळे व्हिनिशियसवरच आक्रमणाची जबाबदारी होती. दुसरीकडे गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या मोरोक्कोने मात्र ब्राझीलला हैराण केले. संपूर्ण सामन्यात त्यांनी चेंडूवर ५९ टक्के ताबा मिळवला. त्यामुळेच ब्राझीलच्या तुलनेत मोरोक्कोनेच लढतीवर वर्चस्व ठेवले, असे म्हणता येईल. २००२मध्ये पाचव्यांदा फिफा विश्वचषक उंचावल्यावर गेल्या २४ वर्षांत ब्राझीलला लौकिकाला साजेशी कामगिरी जमलेली नाही. या बरोबरीनंतर ब्राझील गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याच्या पहिल्या ३० मिनिटांत मोरोक्कोने तब्बल १२ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले. सामन्याच्या २१व्या मिनिटाला सैबारीने गोलरक्षक ॲलिसन बेकरच्या वरून चेंडू जाळ्यात ढकलत मोरोक्कोला १-१ अशी आघाडी मिळवून दिली. या सुरुवातीच्या धक्क्याने ब्राझीलचा संघ काहीसा दबावात आला होता, अशी कबुली ब्राझीलचे मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी दिली. यानंतर ११ मिनिटांनी म्हणजेच ३२व्या मिनिटाला विनिशियसने ब्रुनो गुइमारेसच्या पासवर मोरोक्कोच्या आयनाउईला चकवून उत्कृष्ट गोल केला. व्हिनिशियसचा हा १०वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. मोरोक्कोला दुसऱ्या सत्रातही गोल करण्याची संधी होती, मात्र त्यांना यश लाभले नाही. मोरोक्कोचे प्रशिक्षक मोहम्मद उआहबी यांनी बरोबरीवर समाधान व्यक्त केले.

मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या या सामन्याला ८०,६६३ प्रेक्षक उपस्थित होते, ज्यामध्ये ब्राझीलच्या पाठीराख्यांची संख्या मोठी होती. या बरोबरीसह ब्राझीलने १९३४ मध्ये स्पेनकडून मिळालेल्या पराभवानंतर विश्वचषक सलामीच्या सामन्यांमधील अपराजित राहण्याची मालिका २१ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये १७ विजयांचा समावेश आहे.

हे चुकवू नका!

  • जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला ब्राझील आणि सातव्या क्रमांकावरील मोरोक्को हे साखळी फेरीत एकाच गटात असणारे एकमेव अव्वल १०मधील संघ आहेत.

  • इटालियन वंशाचे कार्लो अँसेलोटी हे ब्राझीलचे पहिले परदेशी प्रशिक्षक ठरले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in