

लॉस एंजेल्स : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आता राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीचा थरार सुरू झाला असून या फेरीच्या पहिल्याच लढतीत चाहत्यांना शेवटच्या मिनिटापर्यंत जोरदार द्वंद्व पाहायला मिळाले. २९ वर्षीय अनुभवी मध्यरक्षक स्टीफन युस्टाकियोने भरपाई वेळेत (इंजरी टाइम) केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर कॅनडाने रविवारी रात्री दक्षिण आफ्रिकेवर १-० अशी मात केली. याबरोबरच कॅनडाने प्रथमच विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आफ्रिकेचे स्वप्न मात्र उद्ध्वस्त झाले.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.
दरम्यान, सहयजमान कॅनडाने ब-गटातून दुसऱ्या, तर आफ्रिकेने अ-गटातून दुसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली होती. या संघांपैकी कोणीही आजवर एकही नॉकआऊट सामना जिंकलेला नव्हता. त्यामुळे कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. लॉस एंजेल्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत ९० मिनिटे दोन्ही संघांत गोलशून्य बरोबरी होती. मात्र ९०+२ मिनिटाला म्हणजेच भरपाई वेळेत ॲलिस्टर जॉन्स्टनच्या लाँग पासवर आफ्रिकेच्या खेळाडूने हेडरद्वारे बचाव केला. मात्र चेंडू डी-बॉक्स बाहेरच उभ्या असलेल्या स्टीफनकडे विसावला व त्याने संधी साधून उत्तम किक लगावत कॅनडाला १-० असा संस्मरणीय विजय मिळवून दिला. आता शनिवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत कॅनडासमोर नेदरलँड्स किंवा मोरोक्कोचे आव्हान असेल.
या ऐतिहासिक विजयानंतर मुख्य प्रशिक्षक जेसी मार्श यांनी खेळाडूंचे कौतुक करत ‘तुम्ही कॅनडाचे हिरो आहात’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या विजयामुळे देशातील फुटबॉलचे भविष्य बदलणार असल्याचे ते म्हणाले, तर स्टीफनने हा विजय संघाच्या कष्टाचे फळ असल्याचे सांगितले. फिफा क्रमवारीत ३०व्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या संघात ७५व्या मिनिटाला तारांकित बचावपटू अल्फोन्सो डेव्हिस मैदानात उतरला, ज्यामुळे संघाचे बळ वाढले.
‘बायर्न म्युनिक’चा हा खेळाडू स्नायूंच्या दुखापतीमुळे साखळी सामन्यांना मुकला होता. त्याने प्रॉमिस डेव्हिडला गोल करण्याची उत्तम संधी निर्माण करून दिली होती, मात्र तो प्रयत्न थोडक्यात चुकला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने सामन्यात चांगला प्रतिकार केला. गोलरक्षक रॉनवेन विल्यम्स याने ५ गोल रोखले. मात्र वेग आणि ताकदीच्या अभावामुळे पराभव पत्करावा लागल्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक हुगो ब्रोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मेस्सीमुळे फिफाला नफा
साखळी फेरीत अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रिया यांच्यातील लढत जगभरात सर्वाधिक पाहिली गेली. या लढतीद्वारे फिफाला ९१.५ टक्के नफा झाला. सरासरीनुसार दर १० पैकी ९ जणांनी हा सामना पाहिला. मेस्सीने त्या लढतीत दोन गोल नोंदवले होते. त्यामुळे एकूणच मेस्सीमुळे फिफाला नफा होत असल्याचे स्पष्ट झाले.
१० पैकी ९ आफ्रिकन देशांची आगेकूच
यंदा प्रथमच आफ्रिका खंडातील १० देश विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. त्यांपैकी नऊ संघांनी बाद फेरी गाठून इतिहास रचला. कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत प्रथमच इतके आफ्रिकन देश बाद फेरीत दाखल झाले. आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका, केप व्हर्डे, मोरोक्को, इजिप्त, अल्जेरिया, सेनेगल, घाना, आयव्हरी कोस्ट, काँगो प्रजासत्ताक या नऊ संघांनी आगेकूच केली, तर फक्त ट्युनिशियाला साखळीत गारद व्हावे लागले. आता सोमवारी दक्षिण आफ्रिका कॅनडाकडून पराभूत झाल्यानंतर या खंडातील ८ संघ अद्याप स्पर्धेत टिकून आहेत. २०१४ व २०२२च्या विश्वचषकात आफ्रिकेतील फक्त २ संघ बाद फेरीपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदा विश्वचषकातील संघांची संख्या ३२ वरून ४८ पर्यंत वाढवण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक लाभ आफ्रिका खंडातील देशांना झाला, असे म्हणता येईल.
आयव्हरीविरुद्ध नॉर्वेच्या हालँडकडे लक्ष
अर्लिंग्टन : विश्वचषकात मंगळवारी रात्री होणाऱ्या लढतीत नॉर्वे आणि आयव्हरी कोस्ट आमनेसामने येतील. या लढतीत नॉर्वेचा तारांकित आक्रमणपटू अर्लिंग हालँडकडे लक्ष असेल. नॉर्वेने आय-गटातून, तर आयव्हरीने इ-गटातून दुसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. नॉर्वने इराक व सेनेगलला धूळ चारली. मात्र फ्रान्सविरुद्ध त्यांनी हालँडसह ९ पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना विश्रांती दिली. परिणामी ते पराभूत झाले होते. दुसरीकडे आयव्हरीने जर्मनीकडून पराभव पत्करल्यानंतर कुरासाओ व इक्वाडोर यांना पराभूत केले.
आजचे सामने
नॉर्वे वि. आयव्हरी कोस्ट - (रात्री १०.३० वाजता)
फ्रान्स वि. स्वीडन - (मध्यरात्री २.३० वाजता)
मेक्सिको वि. इक्वाडोर - (रविवारी सकाळी ६.३० वाजता)
थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप