

कन्सास सिटी : जॉन अरिआसने सामन्याच्या सुरुवातीलाच केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर कोलंबियाने घानाचा १-० असा - पराभव केला. एरोहेड स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून कोलंबियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद - फेरीत म्हणजेच अंतिम १६ संघांमध्ये प्रवेश केला आहे.
या विजयानंतर मंगळवारी व्हँकुव्हर येथे उपांत्यपूर्व फेरीतील जागेसाठी कोलंबियाचा सामना स्वित्झर्लंडविरुद्ध होणार आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच कोलंबियाचा आघाडीवीर जॉन कॉर्डोबाच्या जांघेला दुखापत झाल्यामुळे प्रशिक्षक नेस्टर लॉरेन्झो यांना सुरुवातीलाच बदल करावा लागला. त्यांनी कॉर्डोबाच्या जागी लुईस सुआरेझला मैदानात उतरवले. या बदलाचा संघाला तातडीने फायदा झाला.
१४ व्या मिनिटाला डॅनियल मुनोझने दिलेल्या पासवर लुईस सुआरेझने चेंडू गोलपोस्टच्या दिशेने सरकवला, जिथेच दबा धरून बसलेल्या अरिआसने घानाचा गोलरक्षक लॉरेन्स अती झिगीला चकवून कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला लुईस डायझने गोल केला होता, मात्र तो ऑफसाईड ठरवण्यात आला. घानाचा गोलरक्षक झिगीने सामन्यात ७ उत्कृष्ट बचाव करत आपल्या संघाला सामन्यात टिकवून ठेवले. घानाने सामन्यात एकूण ८ शॉट्स मारले, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आले.
सामना सुरू झाला, तेव्हा कन्सास सिटीतील तापमान ३१.१ अंश सेल्सिअस होते आणि उष्णतेचा निर्देशांक ९६ इतका होता. मध्य-पश्चिम उन्हाळ्यातील अपेक्षित उष्णतेमुळे हा सामना उशिरा सुरू करण्यात आला होता. या सामन्यात खेळाडूंना डिहायड्रेशन आणि कॅम्प्सचा सामना करावा लागला. कोलंबियाने उझबेकिस्तान आणि काँगोविरुद्ध विजय मिळवून तर पोर्तुगालविरुद्ध सामना बरोबरीत सोडवून विश्वचषक गट फेरीत अव्वल स्थान पटकावले होते. स्पेनचे प्रशिक्षक लुईस देला फुएन्ते यांनीही कोलंबियाला जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले आहे. दुसरीकडे, गतवर्षी आफ्रिका कप ऑफ नेशन्ससाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या घानाने इंग्लंड आणि क्रोएशियासारख्या बलाढ्य संघांच्या गटातून बाद फेरीत पोहोचून आधीच सर्वांना चकित केले होते, मात्र कोलंबियाविरुद्ध त्यांचे आक्रमण अपयशी ठरले.