एम्बाप्पे आणि फ्रान्सचा दरारा कायम; स्वीडनला ३-० अशी धूळ चारून सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

तारांकित आक्रमणपटू किलियान एम्बाप्पेसह फ्रान्सची यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. एम्बाप्पेने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर फ्रान्सने बुधवारी राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीतील सामन्यात स्वीडनला ३-० अशी धूळ चारली.
एम्बाप्पे आणि फ्रान्सचा दरारा कायम; स्वीडनला ३-० अशी धूळ चारून सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
एम्बाप्पे आणि फ्रान्सचा दरारा कायम; स्वीडनला ३-० अशी धूळ चारून सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेशX
Published on

ईस्ट रदरफोर्ड : तारांकित आक्रमणपटू किलियान एम्बाप्पेसह फ्रान्सची यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. एम्बाप्पेने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर फ्रान्सने बुधवारी राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीतील सामन्यात स्वीडनला ३-० अशी धूळ चारली. याबरोबरच त्यांनी सलग चौथ्या विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरी (राऊंड ऑफ १६) गाठण्याचा पराक्रम केला. तसेच एम्बाप्पेने या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीसह (प्रत्येकी ६ गोल) संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.

२०१८च्या विजेत्या व २०२२च्या उपविजेत्या फ्रान्सला यंदाही जेतेपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांनी साखळी फेरीत सलग तीन विजय नोंदवताना अनुक्रमे सेनेगल (३-१), इराक (३-०) व नॉर्वे (४-१) यांचा धुव्वा उडवला होता. आता यंदाच्या विश्वचषकातील सलग चौथ्या लढतीत फ्रान्सने किमान तीन गोल नोंदवण्याचा पराक्रम केला. यापूर्वी २०१०मध्ये फ्रान्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक विश्वचषकात त्यांनी किमान राऊंड ऑफ १६ किंवा त्यापुढेच मजल मारली आहे. आता रविवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सची पॅराग्वेशी गाठ पडेल. पॅराग्वेने मंगळवारी जर्मनीला धक्का दिला होता. त्यामुळे फ्रान्सही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार आहे.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत अपेक्षेप्रमाणे फ्रान्सने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. फ्रान्सने सातत्याने केलेल्या आक्रमणास सुरुवातीला यश लाभले नाही. विशेषत: मायकेल ओलिसची बायसिकल किकतर गोलपोस्टला लागून अडली. अखेरीस एम्बाप्नेने पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटात शानदार गोल झळकावून मध्यंतराला फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ओस्माने डेम्बेलेने यासाठी सुरेख पास दिला. मुख्य म्हणजे गोल केल्यावर एम्बाप्पेने थेट प्रशिक्षक दिदिएर देसचॅम्प यांच्या दिशेने धाव घेत त्यांना आलिंगन दिले.

दुसऱ्या सत्रात मग ओलिसने आपली जादू दाखवताना दोन असिस्ट केले. प्रथम ५३व्या मिनिटाला ब्रॅडली बार्कोलाने फ्रान्ससाठी दुसरा गोल झळकावला, तर ७४व्या मिनिटाला ओलिसच्या पासवर एम्बाप्पेने वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा गोल नोंदवून फ्रान्सचा ३-० असा विजय पक्का केला. कारकीर्दीतील तिसरा विश्वचषक खेळणाऱ्या एम्बाप्पेची फिफा विश्वचषकातील एकूण गोलसंख्या आता १८ झाली असून याबाबतीत तो फक्त मेस्सीच्याच (१९ गोल) मागे आहे. म्हणजेच या विश्वचषकाच्या अखेरपर्यंत मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यातील द्वंद्व कायम राहणार आहे.

  • विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांत (नॉकआऊट मॅचेस) एम्बाप्पेचे आता १० गोल झाले असून त्याने ब्राझीलचे महान खेळाडू लिओनिडास आणि रोनाल्डो यांचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत एम्बाप्पे मेस्सीसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. मेस्सीने ३ सामन्यांत ६, तर एम्बाप्पेने ४ सामन्यांत ६ गोल केले आहेत. नॉर्वेविरुद्ध एम्बाप्पेला गोल नोंदवता आला नाही. त्याने इराक व सेनेगलविरुद्ध प्रत्येकी दोन गोल केले होते.

  • आजवरच्या सर्व फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत एम्बाप्पेने दुसरे स्थान मिळवताना जर्मनीच्या क्लोसला (१६) पिछाडीवर टाकले. एम्बाप्पेचे सध्या एकूण १८ गोल झाले आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी १९ गोलसह अग्रस्थानी आहे.

प्रशिक्षकांकडून मानवंदना व आलिंगन

सामना संपायला ५ मिनिटे शिल्लक असताना ८५व्या मिनिटाला एम्बाप्पेला बाहेर बोलावण्यात आले. यावेळी संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. मात्र त्यापेक्षाही डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण ठरला तो देसचॅम्प यांनी दोन्ही हात वर करून वाकून एम्बाप्पेला दिली मानवंदना. देसचॅम्प हे त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी फ्रान्सला गेले होते. त्यामुळे ते काही दिवसांपूर्वी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यासाठी संघासोबत नव्हते. मात्र स्वीडनविरुद्धच्या लढतीपूर्वी ते परतले. देसचॅम्प यांच्या मार्गदर्शनात फ्रान्सने फिफा विश्वचषकात १७वा सामना जिंकला. हासुद्धा एक विक्रम ठरला, कारण कोणत्याही प्रशिक्षकाच्या कार्यकाळात एखाद्या संघाने विश्वचषकातील इतक्या लढती जिंकलेल्या नाहीत. जर्मनीच्या हेल्मूट यांनी १६ सामने जिंकले होते.

चर्चा ओलिसच्या बायसिकल किकची

फ्रान्सचा तारांकित मध्यरक्षक मायकेल ओलिसने या लढतीत अफलातून बायसिकल किक लगावली. मात्र चेंडू गोलपोस्टला लागून अडला. अन्यथा हा गोल स्पर्धेतील सर्वोत्तम ठरू शकला असता. ओलिसच्या किकची सगळीकडे चर्चा सुरू आहे. तसेच त्याचे यंदाच्या हंगामात एकूण ३१ असिस्ट (गोलसहाय्य) झाले आहेत. मेस्सीच्या एका हंगामातील सर्वाधिक ३४ असिस्टचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त ३ असिस्ट दूर आहे. तसेच यंदाच्या विश्वचषकात ओलिसने आतापर्यंत पाच असिस्ट केलेसुद्धा आहेत. विश्वचषकात सर्वाधिक असिस्ट ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या नावे आहे. त्यांनी ४ विश्वचषकांत मिळून एकूण १० असिस्ट केले, तर सध्या ओलिसचे पहिल्याच विश्वचषकात ५ असिस्ट झाले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in