FIFA World Cup 2026 : फ्रान्सच्या ताऱ्यांना रोखण्याचे स्वीडनसमोर कडवे आव्हान

फिफा विश्वचषकातील बाद फेरीत मंगळवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. न्यूयॉर्क स्टेडियमवर स्वीडनच्या बचावफळीपुढे फ्रान्सच्या तारांकित आक्रमणपटूंना रोखण्याचे आव्हान असेल. त्यामुळे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या फ्रान्सचा खेळ पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.
FIFA World Cup 2026 : फ्रान्सच्या ताऱ्यांना रोखण्याचे स्वीडनसमोर कडवे आव्हान
Published on

ईस्ट रदरफोर्ड : फिफा विश्वचषकातील बाद फेरीत मंगळवारी रंगणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. न्यूयॉर्क स्टेडियमवर स्वीडनच्या बचावफळीपुढे फ्रान्सच्या तारांकित आक्रमणपटूंना रोखण्याचे आव्हान असेल. त्यामुळे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या फ्रान्सचा खेळ पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २.३० वाजता सामना सुरू होईल.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे थरार आणखी वाढणार आहे.

दरम्यान, २०१८च्या विजेत्या आणि २०२२मध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्सने यंदादेखील आपला दरारा कायम राखताना साखळीत सलग तिन्ही सामने जिंकून आगेकूच केली. त्यांनी आय-गटात अनुक्रमे सेनेगल, इराक व नॉर्वे यांना धूळ चारली. या ३ सामन्यांत मिळून फ्रान्सने १० गोल केले आहेत. किलियान एम्बाप्पे, उस्माने डेम्बेले असे आक्रमणपटू, तर चाओमेनी, डिझायर, कुंडे असे प्रतिभावान मध्यरक्षक व बचावपटू फ्रान्सकडे आहेत. गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे व डेम्बेले प्रत्येकी ४ गोलसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळेच दिदिएल देसचॅम्प यांच्या प्रशिक्षणात खेळणारा हा संघ धोकादायक मानला जात आहे.

दुसरीकडे स्वीडनने एफ-गटातून तिसऱ्या स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. त्यांनी ३ सामन्यांत १ विजय, १ बरोबरी व १ पराभव अशी कामगिरी केली. नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवातून सावरत त्यांनी जपानला बरोबरीत रोखले, तर ट्युनिशियाला सहज नमवले. आता मात्र फ्रान्सविरुद्ध त्यांची कसोटी लागेल. व्हिक्टर, अँथोनी एलंगा यांच्यावर स्वीडनचे आक्रमण अवलंबून आहे, तर बचावात यासिन अयारी, आयझॅक हेनवर त्यांची भिस्त असेल.

उभय संघांत २३ सामने झाले असून त्यांपैकी फ्रान्सने १२, तर स्वीडनने ६ लढती जिंकल्या आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले आहेत. फिफा विश्वचषकात मात्र ९६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध येतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in