FIFA World Cup 2026 : घानाने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले

फिफा विश्वचषकात एल-गटात इंग्लंड आणि घाना यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. विशेष म्हणजे घानाच्या गोलरक्षकासह बचावपटूंनी अप्रतिम खेळ केला, तर इंग्लंडच्या तारांकित खेळाडूंनी गोल करण्याची संधी वाया घालवली.
घानाने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले
घानाने इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखलेPhoto : X
Published on

अटलांटा : फिफा विश्वचषकात एल-गटात इंग्लंड आणि घाना यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. विशेष म्हणजे घानाच्या गोलरक्षकासह बचावपटूंनी अप्रतिम खेळ केला, तर इंग्लंडच्या तारांकित खेळाडूंनी गोल करण्याची संधी वाया घालवली.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र कोणालाही गोल नोंदवण्यात यश आले नाही. या बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असून, बाद फेरीतील प्रवेशासाठी त्यांना पुढील सामन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सामन्यात इंग्लंडचे चेंडूवर वर्चस्व होते, मात्र घानाच्या बचाव फळीने त्यांना गोल करण्यापासून रोखून धरले. घानाचे प्रशिक्षक कार्लोस क्विरोज यांनी सांगितले की, सुरुवातीच्या मिनिटांपासूनच इंग्लंडला रोखण्याचा आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा आमचा डावपेच होता, ज्यात आम्ही यशस्वी ठरलो. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात क्विरोज इराणचे प्रशिक्षक असताना इंग्लंडकडून ६-२ ने पराभूत झाले होते, मात्र यावेळी त्यांनी इंग्लंडला बरोबरीवर रोखले. इंग्लंडने एकूण १९ प्रयत्न केले, तर घानाने केवळ एकच प्रयत्न केला, तरीही इंग्लंडच्या पदरी अपयश आले.

इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुशेल यांनी घानाच्या बचाव पद्धतीचे कौतुक केले. सामन्याच्या ८६व्या मिनिटाला निकोचा हेडर क्रॉसबारला लागला, त्यानंतर हॅरी केनला मिळालेल्या संधीचेही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. घानाला ७८व्या मिनिटाला पेनल्टीची संधी मिळाली होती, परंतु पंचांनी ती फेटाळली. या निर्णयावर क्विरोज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in