

कॅन्सस सिटी : फिफा विश्वचषकात बुधवार मध्यरात्रीपासून साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याचा थरार सुरू होईल. १२ गटांतील सर्व ४८ संघांचे प्रत्येकी दोन साखळी सामने झाले असून आता प्रत्येकाचा शेवटचा साखळी सामना शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्या गटातून कोण आगेकूच करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. आतापर्यंत मेक्सिको, अमेरिका, अर्जेंटिना, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे व कोलंबिया यांनी बाद फेरी गाठली आहे.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील.
दरम्यान, फिफा विश्वचषकाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही संघाला अतिरिक्त फायदा होऊ नये, या हेतूने एका गटातील शेवटचे दोन्ही साखळी सामने एकाच वेळी सुरू होतील. जसे की २५ जून रोजी ब-गटात रात्री १२.३० वाजता स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा ही लढत व्हँकुव्हर येथे सुरू होईल, तर त्याच वेळी सीटल येथे कतार विरुद्ध बोस्निया आमनेसामने येतील. अशाचप्रकारे पुढील चार दिवस प्रत्येकी ३ गटांचे सामने होतील. एका दिवशी एकूण सहा सामने खेळवण्यात येतील. त्यामुळे एकूणच आता स्पर्धेचा थरार वाढणार आहे.
आजचे सामने
स्वित्झर्लंड वि. कॅनडा - (रात्री १२.३० वाजता)
कतार वि. बोस्निया - (रात्री १२.३० वाजता)
मोरोक्को वि. हैती - (मध्यरात्री ३.३० वाजता)
ब्राझील वि. स्कॉटलंड - (मध्यरात्री ३.३० वाजता)
कोरिया वि. दक्षिण आफ्रिका - (सकाळी ६.३० वाजता)
चेक प्रजासत्ताक वि. मेक्सिको - (सकाळी ६.३० वाजता)
मध्यरात्रीचे सामने
कुरासाओ वि. आयव्हरी कोस्ट - (मध्यरात्री १.३० वाजता)
जर्मनी वि. इक्वाडोर - (मध्यरात्री १.३० वाजता)
नेदरलँड्स वि. ट्युनिशिया - (शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता)
जपान वि. स्वीडन - (शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता)
अमेरिका वि. तुर्कीये - (शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता)
ऑस्ट्रेलिया वि. पॅराग्वे - (शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता)