FIFA World Cup 2026 : केनचा करिष्मा; काँगो गारद

कर्णधार हॅरी केनने दडपणात पुन्हा एकदा तो इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळाडू का आहे, हे दाखवून दिले.
FIFA World Cup 2026 : केनचा करिष्मा; काँगो गारद
FIFA World Cup 2026 : केनचा करिष्मा; काँगो गारद(Photo-X)
Published on

अटलांटा : कर्णधार हॅरी केनने दडपणात पुन्हा एकदा तो इंग्लंडमधील सर्वोत्तम खेळाडू का आहे, हे दाखवून दिले. संघ ०-१ अशा पिछाडीवर असताना केनने नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर इंग्लंडने फिफा विश्वचषकात बुधवारी रात्री काँगो प्रजासत्ताक संघावर २-१ असा विजय मिळवला. आता उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडसमोर यजमान मेक्सिकोचे आव्हान असेल.

अटलांटा स्टेडियमवरील या लढतीतील विजयासह १९६६च्या विजेत्या इंग्लंड संघाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा गोल स्वीकारल्यानंतर इंग्लंडने विजय मिळवण्याची ही दुसरीच वेळ ठरली आहे. सामन्याच्या सातव्या मिनिटालाच काँगोच्या ब्रायन सिपेन्गाने गोल करून इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड याला चकवले आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. काँगोचा गोलरक्षक लिओनेल म्पासी याने उत्तम बचाव करत ज्युड बेलिंगहॅमचे गोलचे तीन प्रयत्न हाणून पाडले. मात्र ७५व्या मिनिटाला केनने हेडरद्वारे इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ११ मिनिटांनी केनने ३-४ बचावपटूंना चकवून अफलातून दुसरा गोल झळकावत इंग्लंडच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

या दोन गोलसह केनने यंदाच्या विश्वचषकातील गोलची संख्या ५ वर नेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या गोलची संख्या ८४ झाली आहे. इंग्लंडचा पुढील सामना अझ्टेका स्टेडियमवर होणार आहे, जिथे १९८६ मध्ये दिएगो मॅराडोनाच्या हँड ऑफ गॉड गोलमुळे इंग्लंड बाहेर पडला होता.

दुसरीकडे ५२ वर्षांनी विश्वचषकासाठी पात्र झालेल्या काँगोचा प्रवास मात्र राऊंड ऑफ ३२ फेरीत थांबला. ४६व्या क्रमांकावर असलेल्या काँगोने यंदाच्या विश्वचषकात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला १-१ अशा बरोबरीवर रोखून सर्वांचे लक्ष वेधले होते.

गोलफलक

  • इंग्लंड (२) - काँगो (१)

  • हॅरी केन (७५वे, ८६वे मिनिट) - ब्रायन (७वे मि.)

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in