

नवी दिल्ली : भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आगामी २०२६ फिफा फुटबॉल विश्वचषक भारतात थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. जागतिक फुटबॉल नियामक संस्था फिफा आणि झी समूह यांच्यात सोमवारी या संदर्भातील करार पूर्ण झाला.
११ जून रोजी या भव्य स्पर्धेला सुरुवात होत असून स्पर्धा सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित होणारा हा विश्वचषक झी एंटरटेन्मेंटच्या नव्याने सुरू झालेल्या ‘युनायटेड ८ स्पोर्ट्स’ नेटवर्कवर दूरदर्शनवर थेट पाहता येईल, तर 'झी ५' या ॲपवर याचे थेट प्रवाह उपलब्ध असणार आहे.
हा २०२६चा विश्वचषक प्रक्षेपण करार एका मोठ्या कराराचा भाग असून, याद्वारे २०३४ पर्यंतच्या फिफाच्या प्रमुख स्पर्धा भारतातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातील. यामध्ये २०३० मधील विश्वचषकाचाही समावेश आहे, ज्याचे आयोजन मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन संयुक्तपणे करणार आहेत. याशिवाय २०२७ चा महिला विश्वचषकही या कराराच्या अंतर्गत भारतात प्रक्षेपित केला जाईल. एकूणच ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.