

आर्लिंग्टन : फिफा विश्वचषकात लिओनेल मेस्सीने सलग सात सामन्यांत गोल करण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जॉर्डनविरुद्धच्या साखळीतील शेवटच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या मेस्सीने ८०व्या मिनिटाला गोल करत हा पराक्रम गाजवला.
या विजयासह अर्जेंटिनाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव केला असून विश्वचषकातील स्वतःचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही मेस्सीने १९ गोलपर्यंत वाढवला आहे.
मेस्सीच्या नावावर आता १२३ आंतरराष्ट्रीय गोल असून तो ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या १४५ गोलच्या विक्रमाच्या मागे आहे. विश्वचषकातील सलग सहा सामन्यांत गोल करण्याचा विक्रम यापूर्वी जस्ट फॉनटेन आणि जेरझिनो यांच्या नावावर होता, जो मेस्सीने मोडीत काढला आहे. मेस्सीने २०१४ मध्ये नायजेरियाविरुद्धही फ्री-किकवर गोल केला होता, अशाप्रकारे विश्वचषकात दोन फ्री-किक गोल करणारा मेस्सी हा पेले, रिव्हलिनो आणि डेव्हिड बेकहॅम यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे
अर्जेंटिनाने साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांत विजय मिळवत गटात ९ गुणांसह अव्वल स्थान मिळवून बाद फेरीत धडक मारली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाची गाठ कापे व्हर्डे या संघाशी पडणार आहे.
सामन्याच्या १९ व्या मिनिटाला जिओव्हानी लो सेल्सोने थेट फ्री-किकवर गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. विश्वचषकातील लो सेल्सोचा हा पहिला गोल ठरला. त्यानंतर ३१ व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेजने पेनल्टी किकवर गोल करत अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात जॉर्डनच्या मौसा अलतमारीने ५५ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत आणली. मात्र, सामन्याच्या ६० व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या लिओनेल मेस्सीने ८० व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाचा विजय ३-१ ने निश्चित केला.
आर्लिंग्टन येथील ‘डॅलस काउबॉय’ स्टेडियमवर ७०,६४९ प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळला गेला. मेस्सीच्या नावावर आता १२३ आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. अर्जेंटिनाने गट फेरीत अव्वल स्थान आधीच निश्चित केले होते, तर जॉर्डन या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता बाद फेरीत अर्जेंटिनाचा पुढील प्रवास दक्षिण फ्लोरिडामध्ये शुक्रवारी सुरू होणार आहे.
अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी सर्व खेळाडूंना संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “सर्व फुटबॉलपटूंना खेळायला मिळणे हे आमचे उद्दिष्ट होते आणि ते आज पूर्ण झाले आहे. कठीण सामन्यातही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.”
जॉर्डनचे प्रशिक्षक जमाल सेल्लामी यांनी सांगितले की, “पहिल्यांदाच विश्वचषकात खेळल्यामुळे खेळाडूंना स्पर्धेचा मोलाचा अनुभव मिळाला आहे, जो भविष्यात नक्कीच कामी येईल. अर्जेंटिनाने या स्पर्धेत आपली धमक कायम राखली असून, मेस्सीच्या १९ गोलसह अर्जेंटिना संघ पुढच्या फेरीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.