

व्हँकुव्हर : इजिप्तचा राजा म्हणून फुटबॉल विश्वात ओळख असलेल्या अनुभवी आक्रमणपटू मोहम्मद सलाहने अखेर रविवारी रात्री त्याची जादू दाखवली. सलाहने नोंदवलेला एक गोल आणि अन्य गोलसाठी केलेल्या सहाय्याच्या बळावर इजिप्तने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवताना न्यूझीलंडचा ३-१ असा पिछाडीवरून पराभव केला.
बीसी प्लेस येथे झालेल्या ग-गटातील या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहणे इजिप्तसाठी गरजेचे होते. इजिप्तचा हा चौथा विश्वचषक असून गेल्या वेळी कतारमधील विश्वचषकासाठी ते पात्र ठरले नव्हते. १९३४मध्ये पहिला विश्वचषक खेळणाऱ्या इजिप्तला आजवर विश्वचषकात एकही सामना जिंकता आला नव्हता. १९९० व २०१८मध्ये देखील त्यांना पहिल्या विजयाने हुलकावणी दिली. तर यंदा काही दिवसांपूर्वीच झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात बेल्जियमविरुद्ध त्यांना १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
अखेरीस जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या इजिप्तने रविवारी ही प्रतीक्षा संपुष्टात आणली. त्यामुळे आता इजिप्तने गटात ४ गुणांसह (१ विजय, १ बरोबरी) अग्रस्थान काबिज केले असून त्यांची २६ तारखेला शेवटच्या साखळी लढतीत दुसऱ्या क्रमांकावरील इराणशी गाठ पडेल. बाद फेरीत पोहोचण्यासाठी इजिप्तला हा सामना किमान अनिर्णित राखणे आवश्यक आहे. न्यूझीलंडचा (२ सामन्यांत १ गुण) शेवटचा सामना बेल्जियमशी होणार असून दोघांनाही ही लढत जिंकणे अनिवार्य असेल.
दरम्यान, उभय संघांतील या लढतीत १५व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या फिन सुरमनने शानदार हेडरद्वारे गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्याला टिम पेनने कॉर्नर किकद्वारे पास दिला होता. मध्यांतरापर्यंत न्यूझीलंडने ही आघाडी कायम ठेवली. मात्र उत्तरार्धात इजिप्तच्या संघाने जोरदार पुनरागमन केले. ५८व्या मिनिटाला मोस्तफा झिको याने सुरेख हेडर करत इजिप्तला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
यानंतर ६७व्या मिनिटाला सलाहने अप्रतिमरीत्या बचावपटूंना चकवून प्रथम झिकोला पास दिला. झिकोने मग बॉक्समध्येच चेंडू पुन्हा सलाहकडे सोपवला व सलाहने त्याला गोलजाळ्याची दिशा दाखवली. ८२व्या मिनिटाला ट्रेझेंगेने आणखी एक हेडर गोल करत इजिप्तचा ३-१ असा विजय पक्का केला. सामन्याच्या ८५व्या मिनिटाला सलाहला मैदानाबाहेर बोलावण्यात आले तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून त्याला दाद दिली. एकूणच हा विजय संस्मरणीय ठरल्याने खेळाडूंसह स्टेडियममधील अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले. सामन्यानंतर प्रशिक्षक होसाम हसन यांनी मैदानावर इजिप्तचा ध्वज फडकवत आनंद साजरा केला.
गोलफलक
इजिप्त (३) - न्यूझीलंड (१)
झिको (५८ मि.) - फिन (१५ मि.)
सलाह (६७)
ट्रेझेंगे (८२)
सलाहने ६८ आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले आहेत. इजिप्तचे प्रशिक्षक होसाम हसन यांच्याच नावावर संघासाठी सर्वाधिक ६९ गोलचा विक्रम आहे. सलाहची विश्वचषकातील एकूण गोलची संख्या ३ झाली आहे. २०१८च्या विश्वचषकात त्याने २ गोल नोंदवले होते. याबरोबरच त्याने इजिप्तसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवले. अब्दुलरहमान फौझी यांनी १९३४च्या विश्वचषकात २ गोल नोंदवले होते.
हा विजय, हा दिवस आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. आजवर आम्ही अनेकांना विश्वचषकात जिंकताना पाहिले, मात्र स्वत: या स्पर्धेत पहिला सामना जिंकण्याचे सुख निराळेच.
मोहम्मद सलाह