

अटलांटा : धक्कादायक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्कोने सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची बाद फेरी गाठली. त्यांनी गुरुवारी क-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात हैतीवर ४-२ अशी मात केली.
मोरोक्को ७ गुणांसह गटात दुसऱ्या स्थानी राहिला, कारण ब्राझीलचा गोलफरक त्यांच्या तुलनेत सरस होता. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या मोरोक्कोने या सामन्यात दोनदा पिछाडीवर असतानाही शानदार पुनरागमन केले. या पराभवामुळे हैतीचे मात्र स्पर्धेतील पहिल्या गुणाचे स्वप्न भंगले असून त्यांचे पॅकअपही झाले आहे.
सामन्याच्या १०व्या मिनिटाला हैतीच्या लेनी जोसेफने केलेल्या फटक्यामुळे मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बोनो याच्याकडून स्वयंचलित गोल (ओन-गोल) झाला. १९७४ नंतर हैतीचा हा विश्वचषकातील पहिलाच गोल ठरला. ३९ व्या मिनिटाला अश्रफ हकिमीने गोल करत मोरोक्कोला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला विल्सन इसिडोरने गोल करत हैतीला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यांतराच्या अतिरिक्त वेळेत इस्माईल सायबारीने गोल करत मोरोक्कोला २-२ अशी बरोबरी करून दिली.
सामन्याच्या ७८व्या मिनिटाला राहिमीने घेतलेला फटका गोलजाळीत गेल्याने मोरोक्को ३-२ ने आघाडीवर आला. त्यानंतर ८९ व्या मिनिटाला यासिनने गोल करत मोरोक्कोचा ४-२ असा विजय निश्चित केला. मोरोक्कोचा संघ ‘गट सी’मध्ये ब्राझीलपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर राहून बाद फेरीत दाखल झाला आहे. आता मोरोक्कोचा बाद फेरीचा सामना मॉन्टेरी येथे फ-गटातील विजेत्या संघाशी होईल.
गोलफलक
मोरोक्को (४) - हैती (२)
हकिमी (३९ मि.) - बोनू (१०)
सैबारी (४५+१) - विल्सन (४३)
रहिमी (७८)
यासिन (८९)