

फॉक्सबरो : फिफा विश्वचषकात गुरुवारी मध्यरात्रीपासून उपांत्यपूर्व फेरीचा थरार सुरू होत आहे. फॉक्सबरो येथील बोस्टन स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत गतउपविजेत्या फ्रान्सची झुंजार वृत्तीच्या मोरोक्कोशी गाठ पडणार आहे. २०२२च्या विश्वचषकात फ्रान्सने उपांत्य फेरीत मोरोक्कोला नमवले होते. त्यामुळे यावेळी मोरोक्को त्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला.
दरम्यान, किलियान एम्बाप्पेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत ५ सामन्यांत १४ गोल नोंदवले आहेत. साखळीत फ्रान्सने इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली. तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. फ्रान्सने या स्पर्धेतील पाचपैकी चार सामन्यांत किमान ३ किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत. एम्बाप्पे, उस्माने डेम्बेले व ओलिस या आक्रमकांची फळी फ्रान्सची ताकद आहे. विशेषत: एम्बाप्पे ७ गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला (८ गोल) मागे टाकण्यासाठी उत्सुक असेल.
फ्रान्सने सलग चौथ्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गेल्या लढतीत पॅराग्वेच्या खेळाडूंनी फ्रान्सच्या खेळाडूंना डिवचण्याचा आणि वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र एम्बाप्पेने शांत राहून खेळावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्यांना यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०२२च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव केला होता.
दुसरीकडे मोरोक्कोने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपउपांत्यपूर्व लढतीत कॅनडाला ३-० अशी धूळ चारली. त्यापूर्वी नेदरलँड्सवरही त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये सरशी साधली होती. फुटबॉल विश्वात अटलास लायन्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्कोची मदार इस्माइल सैबारी, अझेदीन ओनाही, सुफियान रहिमी यांच्यावर आहे. तसेच त्यांचा गोलरक्षकही लयीत आहे.
मोरोक्को हा यंदाच्या स्पर्धेत आता एकमेव आफ्रिकन खंडातील देश शिल्लक आहे. यंदा ९ आफ्रिकन देशांनी बाद फेरी गाठली होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीपर्यंत ८ संघांचे आव्हान संपुष्टात आले. मोरोक्कोने गेल्या विश्वचषकात पोर्तुगाललादेखील नमवले होते. त्यामुळे आता फ्रान्सविरुद्ध मोरोक्कोचा संघ कसा खेळ करणार, याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
उभय संघांत आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यांपैकी फ्रान्सने ४ लढती जिंकल्या आहेत. एकदा मोरोक्कोने बाजी मारली आहे. एक लढत बरोबरीत सुटली होती. तूर्तास फ्रान्सचेच पारडे जड दिसत आहे.
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
* फ्रान्स वि. मोरोक्को : शुक्रवार, १० जुलै (मध्यरात्री १.३० वाजता)
* स्पेन वि. बेल्जियम : शनिवार, ११ जुलै (मध्यरात्री १२.३० वाजता)
* इंग्लंड वि. नॉर्वे : रविवार, १२ जुलै (मध्यरात्री २.३० वाजता)
* अर्जेंटिना वि. स्वित्झर्लंड : रविवार, १२ जुलै (सकाळी ६.३० वाजता)
पहिला उपांत्य सामना : बुधवार, १५ जुलै (मध्यरात्री १२.३० वाजता)
दुसरा उपांत्य सामना : गुरुवार, १६ जुलै (मध्यरात्री १२.३० वाजता)
महाअंतिम मुकाबला : सोमवार, २० जुलै (मध्यरात्री १२.३० वाजता)