

व्हँकुव्हर : २० वर्षीय आक्रमणपटू जोहान मंझाबीने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर स्वित्झर्लंडने ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात कॅनडाला २-१ असे पराभूत केले. स्वित्झर्लंडने ७ गुणांसह गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली, तर कॅनडाने पराभवानंतरही ४ गुणांसह दुसरे स्थान मिळवून बाद फेरी गाठली. स्वित्झर्लंडसाठी रुबेन वर्गासने पहिला गोल नोंदवला.
सामन्याच्या उत्तरार्धात खेळाला वेग आला. ४६व्या मिनिटाला रुबेन वर्गासने गोल करत स्वित्झर्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५७व्या मिनिटाला मंझांबीने गोल करत आघाडी २-० अशी दुप्पट केली. कॅनडाने ७६व्या मिनिटाला प्रतिहल्ला करत गोल केला. प्रोमिस डेव्हिडने मैदानावर उतरल्याच्या पहिल्याच मिनिटाला व्हॉलीद्वारे गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र, त्यानंतर कॅनडाला बरोबरी साधता आली नाही.
स्वित्झर्लंडचे प्रशिक्षक मुरात याकिन यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. ‘आम्ही सध्या ज्या ठिकाणी आहोत, तिथे पोहोचण्यास पात्र आहोत’, असे याकिन म्हणाले. स्वित्झर्लंडला आता बाद फेरीच्या पुढील सामन्यासाठी आठ दिवस विश्रांती मिळणार आहे. त्यांच्यासमोर इ किंवा एफ गटातील तिसऱ्या क्रमांकाचा संघ असेल. दुसरीकडे कॅनडाचा संघ पराभूत झाला असला तरी, त्यांनी प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे कॅनडा आता रविवारी इंगलवूड, कॅलिफोर्निया येथे होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
कॅनडाचे प्रशिक्षक जेसी मार्श म्हणाले की, ‘आता लॉस एंजेलिसमधून देशाला गौरवान्वित करण्याची मोठी संधी आमच्याकडे आहे.’ या सामन्याचा आनंद घेण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी उपस्थित होते.
गोलफलक
स्वित्झर्लंड (२) - कॅनडा (१)
वर्गास (४६ मि.) डेव्हिड (७६)
मंझांबी (५७)