FIFA World Cup 2026 : ऑरेंज आर्मीकडून ट्युनिशियाला टाटा

ऑरेंज आर्मी तसेच डच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेदरलँड्सने शुक्रवारी फिफा विश्वचषकात ट्युनिशियाचे आव्हान संपुष्टात आणताना त्यांचा ३-१ असा पराभव केला. ३ सामन्यांतील २ विजय व एका बरोबरीच्या सात गुणांसह नेदरलँड्सने एफ-गटातून अग्रस्थानासह बाद फेरीत प्रवेश केला.
ऑरेंज आर्मीकडून ट्युनिशियाला टाटा
ऑरेंज आर्मीकडून ट्युनिशियाला टाटाX
Published on

कॅन्सस सिटी : ऑरेंज आर्मी तसेच डच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेदरलँड्सने शुक्रवारी फिफा विश्वचषकात ट्युनिशियाचे आव्हान संपुष्टात आणताना त्यांचा ३-१ असा पराभव केला. ३ सामन्यांतील २ विजय व एका बरोबरीच्या सात गुणांसह नेदरलँड्सने एफ-गटातून अग्रस्थानासह बाद फेरीत प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर क-गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणजेच मोरोक्कोचे कडवे आव्हान असेल.

कॅन्सस सिटी स्टेडियमवर झालेल्या एफ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात ब्रायन ब्रॉबी आणि जॅन पॉल यांनी नेदरलँड्ससाठी प्रत्येकी एक गोल केला, तर एलिस खिरीने स्वयंगोल नोंदवत नेदरलँड्सचे काम सोपे केले. ट्युनिशियाकडून हाझेम मस्तोरीने एकमेव गोल केला. मात्र स्पर्धेत सलग तीन पराभव पत्करल्याने ट्युनिशियाचे आव्हान संपुष्टात आले. त्यांना गटात चौथ्या क्रमांकावर रहावे लागले. दुसऱ्या क्रमांकावरील जपान व तिसऱ्या स्थानावरील स्वीडन यांनीही आगेकूच केली.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील. त्यामुळे आता थरार आणखी वाढत आहे.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्झेल डमफ्रीज याने मारलेला चेंडू ट्युनिशियाचा कर्णधार एलिसच्या पायाला लागून गोलजाळीत गेला, ज्यामुळे नेदरलँड्सला १-० अशी आघाडी मिळाली. त्यानंतर सातव्या मिनिटाला ब्रायनने व्हर्जिल व्हॅन डायक याच्या पासवर गोल करत संघाची आघाडी २-० अशी दुप्पट केली. ट्युनिशियाकडून ५४व्या मिनिटाला हाझेमने गोल करून सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, ६२व्या मिनिटाला पदार्पणवीर जन पॉलने हेडरद्वारे तिसरा गोल नोंदवून नेदरलँड्सचा विजय पक्का केला.

ट्युनिशियाचे प्रशिक्षक साबरी लामौची यांना स्पर्धेच्या सुरुवातीलाच कार्यमुक्त करण्यात आले होते, त्यानंतर हेर्व रेनाड यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. मात्र, संघात दिसून आलेली गटबाजी आणि ताणतणाव कायम राहिल्याने ट्युनिशियाला सहा सामन्यांपासून विजयाची प्रतीक्षा आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in