

ईस्ट रदरफोर्ड : अर्लिंग हालँडने सलग दुसऱ्या सामन्यात दुहेरी गोल नोंदवले. त्यामुळे नॉर्वेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सेनेगलचा ३-२ असा पराभव करून आय-गटातून बाद फेरी गाठली. नॉर्वेची अखेरच्या साखळी सामन्यात फ्रान्सशी गाठ पडणार आहे.
सामन्याच्या ४३व्या मिनिटाला मार्कस पेडरसन याने पहिला गोल करत नॉर्वेला आघाडी मिळवून दिली. दुखापतग्रस्त ज्युलियन रायर्सन याच्या जागी मैदानात आलेल्या पेडरसनने गोलकीपर एडुआर्ड मेंडी याच्या चुकीचा फायदा घेत हे गोल केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात हालँडने आपल्या खेळाची जादू दाखवली. ४८व्या मिनिटाला मार्टिन ओडेगार्ड याच्या पासवर हालँडने डाव्या पायाने गोल करत आघाडी २-० केली. त्यानंतर ५८ व्या मिनिटाला पॅट्रिक बर्ग याच्या पासवर उजव्या पायाने व्हॉली करत हालँडने आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला.
सेनेगलकडून इस्माइला सार याने ५३व्या मिनिटाला आणि दुसऱ्या सत्राच्या भरपाई वेळेत असे दोन गोल केले, मात्र संघाला पराभवापासून वाचवता आले नाही. हालँडने गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २४ गोल केले असून, प्रत्येक सामन्यात त्याने गोल नोंदवण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. त्याने आतापर्यंत ५२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५९ गोल केले आहेत. विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या दोन सामन्यांत दोन गोल करणारा हालँड हा २०१८ नंतरचा हॅरी केननंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
नॉर्वेचा संघ आता शुक्रवारी फ्रान्सविरुद्ध सामना खेळणार असून, या सामन्याच्या निकालावर गटातील पहिले स्थान निश्चित होईल. सलग दोन पराभवांमुळे सेनेगलचे आव्हान संकटात आले असून, त्यांना तिसऱ्या स्थानावरून पुढे जाण्यासाठी इराकविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.