FIFA World Cup 2026 : हालँडचा हंगामा; आयव्हरी कोस्टवर नॉर्वे भारी

स्टार आक्रमणपटू एर्लिंग हालँडने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर नॉर्वेने फिफा विश्वचषकातील बाद फेरीत आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव केला. याबरोबरच त्यांनी २८ वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. नॉर्वेची आता बलाढ्य ब्राझीलशी गाठ पडेल.
FIFA World Cup 2026 : हालँडचा हंगामा; आयव्हरी कोस्टवर नॉर्वे भारी
FIFA World Cup 2026 : हालँडचा हंगामा; आयव्हरी कोस्टवर नॉर्वे भारीX
Published on

अर्लिंग्टन : स्टार आक्रमणपटू एर्लिंग हालँडने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर नॉर्वेने फिफा विश्वचषकातील बाद फेरीत आयव्हरी कोस्टचा २-१ असा पराभव केला. याबरोबरच त्यांनी २८ वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. नॉर्वेची आता बलाढ्य ब्राझीलशी गाठ पडेल.

डल्लास स्टेडियमवरील या सामन्यात पॅट्रिक बर्ग चेंडूसह पेनल्टी एरियामध्ये जात असताना आयव्हरी कोस्टच्या तीन बचावपटूंनी त्याला घेरले. बर्गने हुशारीने बॉल मोकळ्या असलेल्या हालँडकडे पास केला, ज्याने चालू स्पर्धेतील आपला पाचवा गोल झळकावला. नॉर्वेसाठी अँटोनियो नुसाने पहिल्या सत्रात ७४व्या मिनिटाला पहिला गोल केला होता. आपल्या चौथ्या विश्वचषकात खेळणारा नॉर्वेचा संघ रविवारी न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. हा सामना १९९८ मधील नॉर्वेच्या ब्राझीलवरील ऐतिहासिक विजयाची आठवण करून देणारा ठरेल. नॉर्वे संघ १९९८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात खेळत आहे. त्या वेळी संघाने गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात ८३व्या आणि ८९व्या मिनिटाला गोल करून तत्कालीन विश्वविजेत्या ब्राझीलवर २-१ असा अद्भूत पुनरागमन विजय मिळवला होता आणि बाद फेरी गाठली होती.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, कोस्टच्या अमाद डियालोने ७४व्या मिनिटाला डाव्या पायाने गोल करून सामना १-१ अशा बरोबरीत आणला होता. हालँडने ५३ सामन्यांत ६० गोल करत नॉर्वेसाठी नवा विक्रम प्रस्थापित केल्यानंतरही आयव्हरी कोस्टने दबाव कायम ठेवला होता. आयव्हरी कोस्टला भरपाई वेळेच्या (स्टॉपेज टाईम) सहाव्या मिनिटाला डियालोच्या डायरेक्ट फ्री किकमुळे सामना बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. परंतु नॉर्वेचा गोलरक्षक ओर्यान नायलंडने डावा हात झेपवत उत्कृष्ट बचाव केला, जो त्याचा सामन्यातील एकंदर चौथा बचाव ठरला.

अनोखा जल्लोष

नॉर्वेचा संघ यंदाच्या विश्वचषकात त्यांच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जात आहे. सामना जिंकल्यानंतर ते स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांसह ड्रम वाजवून जल्लोष करतात. यावेळी खेळाडू मैदानात बसतात, तसेच चाहतेही त्यांच्यासह ‘हू, हू’ असा आवाज करत प्रत्येक ठोक्याला ताल धरतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in