FIFA World Cup 2026 : पोर्तुगाल रामोस भरोसे! भरपाई वेळेतील निर्णायक गोलमुळे क्रोएशियावर २-१ अशी मात

तारांकित आक्रमणपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पोर्तुगालचे यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान ‘रामोस’ भरोसे टिकून आहे. २५ वर्षीय आक्रमणपटू गोंझालो रामोसने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर पोर्तुगालने शुक्रवारी राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियावर २-१ अशी पिछाडीवरून मात केली.
FIFA World Cup 2026 : पोर्तुगाल रामोस भरोसे! भरपाई वेळेतील निर्णायक गोलमुळे क्रोएशियावर २-१ अशी मात
FIFA World Cup 2026 : पोर्तुगाल रामोस भरोसे! भरपाई वेळेतील निर्णायक गोलमुळे क्रोएशियावर २-१ अशी मातX
Published on

टोरंटो : तारांकित आक्रमणपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पोर्तुगालचे यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान ‘रामोस’ भरोसे टिकून आहे. २५ वर्षीय आक्रमणपटू गोंझालो रामोसने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर पोर्तुगालने शुक्रवारी राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियावर २-१ अशी पिछाडीवरून मात केली.

रोनाल्डोने पेनल्टीद्वारे पहिला गोल नोंदवून संघाच्या विजयात योगदान दिले. त्याचा हा बाद फेरीच्या लढतींमधील पहिलाच गोल ठरला. मात्र रोनाल्डोला सबस्टिट्यूट (बदली खेळाडू) केल्यानंतर पोर्तुगालच्या आक्रमणाला अधिक धार आली व याचाच लाभ घेत त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लुका मॉड्रिचसह क्रोएशियाचा मात्र विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला.

टोरंटो स्टेडियमवर ४३ हजारांहून अधिक चाहत्यांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत भरपाई वेळेच्या शेवटच्या मिनिटात क्रोएशियानेदेखील दुसरा गोल नोंदवला होता. मात्र पंचांनी हा गोल ऑफसाइड ठरवल्याने क्रोएशियाच्या खेळाडूंसह रेफ्रीमध्ये बराच काळ वाद झाला. समाज माध्यमांवरही क्रोएशियाला चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याची चर्चा आहे. तसेच क्रोएशियाच्या चाहत्यांनीही बाटल्यांसह अन्य साहित्य रागाच्या भरात मैदानात भिरकावून दिले. ४० वर्षीय मॉड्रिचचा हा विश्वचषक कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला. २०१८मध्ये अंतिम, तर २०२२मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या क्रोएशियाला यंदा उपउपांत्यपूर्व फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला. दुसरीकडे पोर्तुगालने सलग तिसऱ्या विश्वचषकात राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश केला असून त्यांच्यापुढे आता बलाढ्य स्पेनचे कडवे आव्हान असेल.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी ३२ संघांनी बाद फेरी गाठल्यावर आता प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येत आहे, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, उभय संघांमधील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचने गोल नोंदवून क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. मात्र १५ मिनिटांतच निकोला व्लासिचच्या फाऊलमुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली आणि रोनाल्डोने त्याचे गोलमध्ये रुपांतर केले. त्याचा हा यंदाच्या विश्वचषकातील तिसरा गोल ठरला. त्यानंतर ८०व्या मिनिटाला रोनाल्डोला मैदानाबाहेर बोलावण्यात आले. यावेळी तो काहीसा नाराज दिसला. मात्र ९४व्या मिनिटाला रामोसने हेडरद्वारे अफलातून गोल केल्यावर रोनाल्डोसह सर्व संघाने एकच जल्लोष केला. क्रोएशियाचा दुसरा गोल नाकारण्यात आल्यावर पोर्तुगालचा विजय पक्का झाला.

रोनाल्डोने विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यात (नॉकआऊट) प्रथमच गोल नोंदवला. तसेच बाद फेरीत गोल करणारा तो सर्वाधिक वयस्कर फुटबॉलपटू ठरला.

दिएगो जोटाला विशेष आदरांजली

गतवर्षी पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या दिएगो जोटाचे ३ जुलै, २०२५ रोजी कार अपघातात निधन झाले. बरोबर वर्षभराने त्याच दिवशी विश्वचषकातील बाद फेरीचा सामना जिंकल्यावर रोनाल्डोसह पोर्तुगालचे अनेक खेळाडू भावूक झाले. त्यामुळे रोनाल्डोने जोटाच्या २१ क्रमांकाची जर्सी परिधान करून त्याला हा विजय समर्पित केला. तसेच पोर्तुगालच्या सर्व खेळाडूंसह स्टेडियममधील चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष करून अनोखी आदरांजली वाहिली. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने आपली जर्सी फिरवून दाखवली, ज्यावर त्याचा सहकारी जोटा याचे नाव आणि २१ क्रमांकाचा आकडा होता.

शेवटच्या मिनिटाचे थरारनाट्य अन् मॉड्रिचचा अलविदा

रामोसच्या गोलनंतर सामन्यात थरारनाट्य पाहायला मिळाले. क्रोएशियाच्या मारिओ पासालिकने शेवटच्या क्षणी चेंडू जाळ्यात धाडला, मात्र अडीच मिनिटांच्या तपासणीनंतर व्हीएआरने त्याला ऑफसाइड घोषित केले. क्रोएशियाचा मिडफिल्डर पेटार सुसिक याने सांगितले की, रेफरीला चेंडूला कोणाचा स्पर्श झाला हे दिसले नाही, मात्र चेंडूमध्ये सेन्सर असल्यामुळे हा निर्णय दिल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यासाठी तो नियमित गोल होता, असे सुसिक म्हणाला. पोर्तुगालचे प्रशिक्षक रोबेर्तो मार्टिनेझ यांनीही चेंडूतील चिपमुळेच व्हीएआरने हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट केले.

हा सामना वयाची चाळीशी पार केलेल्या दोन दिग्गज फुटबॉलपटूंमधील द्वंद्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. पोर्तुगालचा रोनाल्डो आपल्या सहाव्या विश्वचषकात खेळत आहे, तर क्रोएशियाचा मॉड्रिच पाचव्यांदा जेतेपदासाठी प्रयत्न करत होता. रिअल माद्रिदमध्ये एकत्र खेळलेले रोनाल्डो आणि मॉड्रिच सामना सुरू होण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारताना दिसले, तसेच सामन्यानंतरही त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मॉड्रिच हा फुटबॉल विश्वातील एक महानायक असल्याचे रोनाल्डोने सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in