

फिलाल्फिया : फिफा विश्वचषकात शनिवारी रात्रीपासून उपउपांत्यपूर्व फेरी म्हणजेच राऊंड ऑफ १६ फेरीचा थरार सुरू होईल. शुक्रवारपर्यंत १३ संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला होता. तर फक्त ३ संघ ठरण्याचे बाकी होती. आता शनिवारी रात्री सर्वात पहिल्या उपउपांत्यपूर्व लढतीत मोरोक्को व कॅनडा आमनेसामने येतील, तर मध्यरात्री किलियान एम्बाप्पेच्या फ्रान्ससमोर धक्कादायक वृत्तीच्या पॅराग्वेचे आव्हान असेल.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी ३२ संघांनी बाद फेरी गाठल्यावर आता प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येत आहे, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.
दरम्यान, फ्रान्सने या स्पर्धेतील चारही सामन्यांत किमान ३ किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत. यावरूनच त्यांचे आक्रमण किती धारदार आहे, हे समजते. साखळी फेरीत त्यांनी इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली, तर राऊंड ऑफ ३२ फेरीत स्वीडनला नमवले. फ्रान्सच्या एम्बाप्पेने विश्वचषकात आतापर्यंत ६ गोल केले आहेत. तसेच एकंदर विश्वचषकातील त्याची गोलसंख्या १८ झाली आहे. त्यामुळे तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याच्या शर्यतीत आहे. एम्बाप्पेला ओलिस व डेम्बेले यांची सुरेख साथ लाभत आहे.
दुसरीकडे पॅराग्वेने जर्मनीला पेनल्टी शूटआऊटमध्ये धक्का दिला आहे. त्यामुळे फ्रान्स त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही.
मोरोक्को विरुद्ध कॅनडा लढतीतही थरार अपेक्षित आहे. कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला, तर मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सला पराभूत केले. मोरोक्कोने गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यंदादेखील ते त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतुर असतील.
उपउपांत्यपूर्व फेरीचे ठरलेले सामने
कॅनडा वि. मोरोक्को : शनिवार, ४ जुलै (रात्री १०.३० वाजता)
फ्रान्स वि. पॅराग्वे : रविवार, ५ जुलै (मध्यरात्री २.३० वाजता)
ब्राझील वि. नॉर्वे : सोमवार, ६ जुलै (मध्यरात्री १.३० वाजता)
इंग्लंड वि. मेक्सिको : सोमवार, ६ जुलै (पहाटे ५.३० वाजता)
स्पेन वि. पोर्तुगाल : मंगळवार, ७ जुलै (मध्यरात्री १२.३० वाजता)
बेल्जियम वि. अमेरिका : मंगळवार, ७ जुलै (पहाटे ५.३० वाजता)
सातवा उपउपांत्यपूर्व सामना : मंगळवार, ७ जुलै (रात्री ९.३० वाजता)
आठवा उपउपांत्यपूर्व सामना : बुधवार, ८ जुलै (मध्यरात्री १.३० वाजता)
१३ संघ ठरले, उर्वरित तीन संघांची प्रतीक्षा
मियामी : फिफा विश्वचषकाचा थरार आता आणखी वाढत असून उपउपांत्यपूर्व फेरीतील १३ संघ ठरलेले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत उर्वरित ३ संघ ठरणार असून शनिवारी रात्रीपासूनच उपउपांत्यपूर्व फेरीचा म्हणजेच राऊंड ऑफ १६चा संघर्ष सुरू होईल. आतापर्यंत यजमान कॅनडा, ब्राझील, फ्रान्स, मोरोक्को, पॅराग्वे, इंग्लंड, मेक्सिको, बेल्जियम, नॉर्वे, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन व स्वित्झर्लंड या १३ संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठलेली आहे. उर्वरित ३ संघांमध्ये अर्जेंटिना, केप व्हर्डे, इजिप्त, ऑस्ट्रिेलिया, कोलंबिया व घाना यांच्यापैकी कोण जागा मिळवणार, याकडे लक्ष असेल. शनिवारी सकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.