FIFA World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचा पराक्रम; दक्षिण कोरियाला धक्का देत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

फिफा विश्वचषकात अ-गटात दक्षिण आफ्रिकेने दक्षिण कोरियाला १-० असा पराभवाचा धक्का देत दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली.
FIFA World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचा पराक्रम; दक्षिण कोरियाला धक्का देत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक
FIFA World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेचा पराक्रम; दक्षिण कोरियाला धक्का देत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक(Photo-X/@brfootball)
Published on

ग्वाडालप : फिफा विश्वचषकात अ-गटात दक्षिण आफ्रिकेने दक्षिण कोरियाला १-० असा पराभवाचा धक्का देत दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. मुख्य म्हणजे आफ्रिकेने प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. दक्षिण कोरियाचे पुढील फेरीतील स्थान आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना रविवारी कॅलिफोर्नियातील एंगलवूड येथे ब-गटामधील दुसऱ्या स्थानावरील कॅनडाशी होईल.

सामन्याच्या ६३व्या मिनिटाला त्शेपांग मोरेमीने दिलेल्या अचूक क्रॉसवर २२ वर्षीय फॉरवर्ड थापेलो मासेकोने शानदार गोल करत दक्षिण आफ्रिकेला १-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. मासेकोने डाव्या पायाने मारलेला सखल फटका थेट गोलजाळीत विसावला, ज्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व राखीव खेळाडूंनी मैदानावर धाव घेतली. चालू स्पर्धेत एकूण ८ शॉट्ससह मासेको संघात आघाडीवर आहे. मामेलोडी सनडाऊन्स या दक्षिण आफ्रिकन क्लबसाठी खेळणाऱ्या मासेकोला या कामगिरीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘मी स्वतःला स्वप्ने पाहत राहण्यास सांगेन.’

दक्षिण आफ्रिकेचा संघ अ-गटात मेक्सिकोनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला. यापूर्वी १९९८, २००२ आणि २०१० मध्ये यजमान असूनही दक्षिण आफ्रिकेला साखळी फेरी पार करता आली नव्हती. यंदाच्या विश्वचषकाची सुरुवात मेक्सिकोविरुद्ध २-० अशा पराभवाने झाल्यानंतर आणि झेक प्रजासत्ताकविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला बाद फेरीत पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य होता. पहिल्या सामन्यात मेक्सिकोविरुद्ध रेड कार्ड मिळालेला स्पेफेलो सिथोले या सामन्यात सुरुवातीपासून खेळला आणि त्याने संघाला गोल न स्वीकारता क्लीन शीट राखण्यात मदत केली. सिथोले याने सांगितले की सुरुवातीचे २-३ दिवस सोपे नव्हते, पण स्वतःला सावरून चांगली कामगिरी केल्याचा अभिमान आहे. दक्षिण आफ्रिकेचे ७४ वर्षीय मुख्य प्रशिक्षक ह्यूगो ब्रूस यांनी संघाच्या मानसिकतेचे कौतुक केले.

गोलफलक

  • द. आफ्रिका (१) - द. कोरिया (०)

  • मासेको (६३)

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in