FIFA World Cup 2026 : स्पेनकडून सौदी अरेबियाचा ४-० असा धुव्वा

युवा सुपरस्टार लॅमिन यमालने आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात सुरुवातीच्या १० मिनिटांत पहिला गोल करून स्पेनच्या मोहिमेला गती दिली.
FIFA World Cup 2026 : स्पेनकडून सौदी अरेबियाचा ४-० असा धुव्वा
FIFA World Cup 2026 : स्पेनकडून सौदी अरेबियाचा ४-० असा धुव्वा(Photo-X)
Published on

अटलांटा : युवा सुपरस्टार लॅमिन यमालने आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात सुरुवातीच्या १० मिनिटांत पहिला गोल करून स्पेनच्या मोहिमेला गती दिली. अटलांटा येथे रविवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनने सौदी अरेबियाचा ४-० असा दणदणीत पराभव केला. कर्णधार मिकेल ओयारझबालने दोन गोल नोंदवून छाप पाडली.

१८ वर्षांच्या यमालने लो क्रॉसवर शानदार गोल करत फिफा विश्वचषकाच्या इतिहासात गोल करणारा आठवा सर्वात तरुण खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. केप व्हर्डेविरुद्ध पहिल्या सामन्यात ०-० अशी धक्कादायक बरोबरी स्वीकारावी लागल्यानंतर दबावाखाली असलेल्या स्पेनसाठी हा गोल अत्यंत महत्त्वाचा ठरला. पहिला सामना आमच्या अपेक्षेप्रमाणे झाला नव्हता, पण आता आम्ही लय पकडली असून आणखी पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत, असे यमाल सामन्यानंतर म्हणाला. बार्सिलोनाकडून खेळणारा हा विंगर वयाच्या १६ व्या वर्षी २०२४ च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये स्पेनला जेतेपद मिळवून देऊन जगातील अव्वल खेळाडूंमध्ये सामील झाला होता.

स्पेनने २०१० मध्ये विश्वचषक जिंकल्यापासून त्यांना बाद फेरीच्या पुढे जाता आले नव्हते. मात्र, यमालच्या गोलने स्पेनच्या इतर खेळाडूंमध्येही उत्साह भरला. मिकेल ओयारझाबालने यमालला गोल करण्यासाठी मदत तर केलीच, पण स्वतः २१ व्या आणि २४ व्या मिनिटाला दोन गोल करत स्पेनला ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.

स्पेनचे वर्चस्व पाहून प्रशिक्षक डी ला फुएन्ते यांनी मध्यंतरालाच यमाल आणि ओयारझाबाल या दोघांना विश्रांती दिली. उत्तरार्धात ४९ व्या मिनिटाला मार्क कुकुरेल्लाच्या शॉटवर सौदी अरेबियाच्या हसन अल्तामबक्तीकडून स्वंयगोल (ओन गोल) झाल्याने स्पेनचा ४-० असा विजय निश्चित झाला.

logo
marathi.freepressjournal.in