स्पेनची तटबंदी बेल्जियम भेदणार? लॉस एंजेल्स स्टेडियमवर आज दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार निर्णायक उपांत्यपूर्व सामना

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लॉस एंजेल्स स्टेडियमवर शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात युरोप खंडातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू न दिलेल्या स्पेनची बेल्जियमशी गाठ पडणार आहे. त्यामुळे ‘रेड डेव्हिल्स’ म्हणून ओळखला जाणारा बेल्जियमचा संघ स्पेनचा बचाव भेदणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
स्पेनची तटबंदी बेल्जियम भेदणार? लॉस एंजेल्स स्टेडियमवर आज दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार निर्णायक उपांत्यपूर्व सामना
स्पेनची तटबंदी बेल्जियम भेदणार? लॉस एंजेल्स स्टेडियमवर आज दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार निर्णायक उपांत्यपूर्व सामनाX
Published on

इंगलवूड : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लॉस एंजेल्स स्टेडियमवर शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात युरोप खंडातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू न दिलेल्या स्पेनची बेल्जियमशी गाठ पडणार आहे. त्यामुळे ‘रेड डेव्हिल्स’ म्हणून ओळखला जाणारा बेल्जियमचा संघ स्पेनचा बचाव भेदणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला. गुरुवारी मध्यरात्री फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यातील लढतीपासून उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. आता दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमच्या ‘गोल्डन जनरेशन’ समोर ‘टिकी-टाका’ स्वरुपाचे फुटबॉल खेळणाऱ्या स्पेनचे कडवे आव्हान असेल.

२०१०च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या स्पेनने यंदा साखळी फेरीत ह-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सौदी अरेबिया व उरुग्वे यांना धूळ चारली, तर केप व्हर्डेविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) स्पेनने ऑस्ट्रियाला ३-० असे नेस्तनाबूत केले, तर उपउपांत्यपूर्व लढतीत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा स्वप्नभंग करताना १-० असा विजय मिळवला. या पाचही लढतीत स्पेनने एकही गोल स्वीकारलेला नाही. म्हणजेच त्यांचा गोलरक्षक उनाई सिमॉनसह अन्य बचावपटूंना भेदण्यात अद्याप एकालाही यश लाभलेले नाही. त्यामुळेच स्पेनच्या बचावफळीविरुद्ध बेल्जियमच्या आक्रमकांचा कस लागेल. त्याशिवाय मिकेल ओयारझबाल, १८ वर्षीय लॅमिन यमाल असे प्रतिभावान आक्रमक व डॅनी ओल्मो, पेड्री, कर्णधार रॉड्री असे मध्यरक्षक स्पेनच्या ताफ्यात आहेत. ओयारझबालने स्पेनकडून या विश्वचषकात सर्वाधिक ४ गोल केले आहेत.

दुसरीकडे युरी टिलेमन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेल्जियमने स्पर्धेची सुरुवात काहीशी थंड केली. साखळी फेरीत त्यांनी इजिप्त, इराणविरुद्ध बरोबरीत समाधान मानले, तर न्यूझीलंडवर ५-१ असा विजय मिळवून ग-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली. त्यानंतर राऊंड ऑफ ३२ लढतीत बेल्जियमने आक्रमणाची धार वाढवली. सेनेगलविरुद्ध ०-२ अशा पिछाडीवर असताना बेल्जियमने ३-२ अशा शानदार विजय मिळवला. तर उपउपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमने यजमान अमेरिकेचा ४-१ असा धुव्वा उडवला. अमेरिकाविरुद्ध केव्हिन डीब्रुएने, जेरेमी डोकू या खेळाडूंना विश्रांती देतही बेल्जियमने बाजी मारून दाखवली. मात्र आता स्पेनविरुद्ध डीब्रुएनेचे पुनरागमन पक्के मानले जात आहे. त्याशिवाय कर्णधार टिलेमन्स, अनुभवी आक्रमक रोमेलू लुकाकू, चार्ल्स केटेलेरे व लिएंड्रो ट्रोसार्ड यांच्यावर बेल्जियमची भिस्त असेल.

एकूणच या लढतीत चाहत्यांना दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते स्पेनचे पारडे विजयासाठी जड मानले जात आहे. मात्र बेल्जियममध्येही त्यांना नमवण्याची नक्कीच क्षमता आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमी हा सामना चुकवू शकत नाहीत.

हे माहीत आहे का?

बेल्जियमने एकूण चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. गेल्या चार विश्वचषकांत तिसऱ्यांदा त्यांनी अशी कामगिरी केली. २०१८मध्ये मिळवलेला तिसरा क्रमांक हीच बेल्जियमची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता त्यांना तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.

स्पेनने एकंदर सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. २०१०मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांना पुढील ३ विश्वचषकांत उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला होता. आता स्पेनचे लक्ष्य तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे असेल.

या खेळाडूंवर नजरा

स्पेन विरुद्ध बेल्जियम लढतीत काही खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरेल. त्यांपैकीच एक म्हणजे स्पेनचा गोलरक्षक सिमॉन. सध्या तो आघाडीचा गोलरक्षक असून विक्रमी ६०९ मिनिटे त्याने एकही गोल होऊ दिलेला नाही. तसेच आक्रमक यमालला अद्याप गोलधडाका करता आलेला नसला तरी तो अन्य खेळाडूंना गोलसहाय्य करत आहे. ओयरझबाल निर्णायक ठरू शकतो. बेल्जियमकडून केटेलेरे, टिलेमन्स व ट्रोसार्ड या त्रिकुटाची कामगिरी मोलाची असेल. डीब्रुएने व लुकाकू यांच्या अनुभवाचा बेल्जियमने योग्य वापर करून घेतला, तर ते स्पेनला नक्कीच नमवू शकतात. लुकाकूने बेल्जियमकडून या विश्वचषकात सर्वाधिक ३ गोल केले आहेत.

गोलरक्षक सिमॉनने विश्वचषकात सलग ६०९ मिनिटे एकही गोल न स्वीकारण्याचा विश्वविक्रम केला असून स्पेन विश्वचषकात सलग ६ सामने क्लीन शीट राखणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी २०२२मध्ये मोरोक्कोला निर्धारित वेळेत बरोबरीत रोखले होते. त्यानंतर २०२६च्या विश्वचषकातील पाच सामन्यांचा यामध्ये समावेश आहे.

भारतीय चाहत्यांचा अंदाज

भारताचा फुटबॉल संघ विश्वचषकासाठी पात्र ठरत नसला, तरी भारतातील चाहते मोठ्या प्रमाणावर विश्वचषकाचे सामने पाहत असतात. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने पाहण्यासाठी चाहत्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. भारतातील अनेक युवकांच्या मते स्पेन या लढतीत बेल्जियमचा पराभव करेल, असे अपेक्षित आहे.

आमनेसामने

स्पेन-बेल्जियम यांच्यात २२ सामने झाले आहेत. त्यांपैकी १२ लढतींमध्ये स्पेनने बाजी मारली आहे, तर फक्त ५ वेळा बेल्जियम जिंकली आहे. ५ लढती बरोबरीत सुटल्या आहेत.

विश्वचषकात आतापर्यंत उभय संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. १९८६ व १९९०च्या विश्वचषकात झालेल्या या दोन्ही लढतींमध्ये स्पेनने बाजी मारली होती. आता ३६ वर्षांनी उभय संघ विश्वचषकात आमनेसामने येतील.

स्पेन वि. बेल्जियम

  • स्थळ : लॉस एंजेल्स स्टेडियम, इंगलवूड

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून (शनिवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in