FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंड सलग चौथ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत

ब्रील एम्बोलो आणि डॅन एन्डोये यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर स्वित्झर्लंडने शुक्रवारी फिफा विश्वचषकात राऊंड ऑफ ३२ फेरीच्या सामन्यात अल्जेरियावर २-० असे वर्चस्व गाजवले. याबरोबरच त्यांनी सलग चौथ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. आता स्वित्झर्लंडची कोलंबिया किंवा घाना यांच्याशी गाठ पडेल.
स्वित्झर्लंड सलग चौथ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत
स्वित्झर्लंड सलग चौथ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीतX
Published on

व्हँकुव्हर : ब्रील एम्बोलो आणि डॅन एन्डोये यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर स्वित्झर्लंडने शुक्रवारी फिफा विश्वचषकात राऊंड ऑफ ३२ फेरीच्या सामन्यात अल्जेरियावर २-० असे वर्चस्व गाजवले. याबरोबरच त्यांनी सलग चौथ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. आता स्वित्झर्लंडची कोलंबिया किंवा घाना यांच्याशी गाठ पडेल.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी ३२ संघांनी बाद फेरी गाठल्यावर आता प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येत आहे, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, बीसी प्लेस येथे झालेल्या या लढतीतील विजयासह स्वित्झर्लंडने १९३८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकातील बाद फेरीचा सामना जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी १९५४ मध्ये त्यांनी बाद फेरीच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या सलग तीन विश्वचषक स्पर्धेत स्वित्झर्लंडने किमान उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र तिन्ही वेळेस त्यांना पुढे आगेकूच करता आली नाही.

“आज आम्ही इतिहासाचे एक पान लिहिले आहे, पण आम्हाला आणखी पुढे जायचे आहे,” असा विश्वास न्डोये याने सामन्यानंतर व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयानंतर स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी मैदानावरच बसून चाहत्यांच्या गाण्यांचा आनंद घेतला आणि गाणे संपताच सर्वांनी एकत्र येत नृत्य करून जल्लोष केला. अल्जेरियाचा संघ २०१४ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत परतला होता, मात्र या पराभवामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

सामन्याच्या पहिल्या १० मिनिटांत अल्जेरियाने वर्चस्व राखले होते, मात्र १२व्या मिनिटाला जोहान मंझांबीने उजव्या बाजूने धावत जात एम्बोलोला पास दिला आणि एम्बोलोने चेंडू जाळ्यात धाडला. एम्बोलोने गुडघ्यावरून घसरत जात आपल्या २६व्या आंतरराष्ट्रीय गोलचा आनंद साजरा केला. उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला एन्डोयेने बॉक्सच्या वरच्या भागातून मारलेला वेगवान फटका अल्जेरियाचा गोलरक्षक लुका झिदान झेप घेऊनही रोखू शकला नाही आणि स्वित्झर्लंडला २-० अशी निर्णायक आघाडी मिळाली.

८१व्या मिनिटाला फॅबियन रीडरला तिसरा गोल करण्याची संधी होती, मात्र त्याचा फटका हुकला. २० वर्षीय मंझांबी या स्पर्धेत दोन गोल आणि दोन असिस्टसह स्वित्झर्लंडचा मुख्य स्टार ठरला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in