FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाच्या मार्गात स्वित्झर्लंड

फिफा विश्वचषकात रविवारी सकाळी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाची स्वित्झर्लंडशी गाठ पडणार आहे.
FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाच्या मार्गात स्वित्झर्लंड
FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाच्या मार्गात स्वित्झर्लंड(Photo-X)
Published on

कान्सास सिटी : फिफा विश्वचषकात रविवारी सकाळी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाची स्वित्झर्लंडशी गाठ पडणार आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाला गेल्या दोन लढतींमध्ये विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यामुळे आता स्वित्झर्लंडविरुद्ध ते वर्चस्वपूर्ण विजय मिळवणार की स्वित्झर्लंड धक्कादायक कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. कान्सास सिटी स्टेडियमवर ही लढत होईल.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला. आता फ्रान्सच्या विजयासह मोरोक्कोचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुढील काही दिवसांत उपांत्य फेरीतील अन्य तीन संघ स्पष्ट होतील.

दरम्यान, गतविजेत्या अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना इजिप्तवर ३-२ अशी मात केली. साखळीत तिन्ही सामने जिंकणाऱ्या अर्जेंटिनाला केप व्हर्डेविरुद्धही ३-२ असा विजय मिळवता आला. ३९ वर्षीय मेस्सीने अर्जेंटिनासाठी सर्वाधिक ८ गोल केले असून पुन्हा एकदा त्याच्यावर संघाची भिस्त असेल. त्याशिवाय ज्युलियन अल्वारेझ, लॉटारो मार्टिनेझ, एंझो फर्नांडेझ यांच्याकडून मेस्सीला सहाय्य अपेक्षित आहे. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला अद्याप छाप पाडता आलेली नाही.

दुसरीकडे स्वित्झर्लंडने उपउपांत्यपूर्व लढतीत झुंजार वृत्तीच्या कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले. २० वर्षीय जोहान मंझांबी या स्पर्धेत स्वित्झर्लंडसाठी चमकदार कामगिरी करत आहे. त्याने ४ सामन्यांत ३ गोल व २ असिस्ट केले आहेत. त्याला एम्बोलो, कर्णधार झाका व एन्डोये यांच्याकडून साथ अपेक्षित आहे. मॅन्युएल अकांजीला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. ७२ वर्षांनी उपांत्यपूर्व फेरी गाठणारा स्वित्झर्लंड अर्जेंटिनाला रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

हे माहीत आहे का?

  • अर्जेंटिनाने तब्बल १२व्यांदा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यांपैकी सहा वेळाच त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. १९७८, १९८६ व २०२२चा विजेता अर्जेंटिना यंदा चौथ्या जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.

  • स्वित्झर्लंडने तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. १९३४ व १९५४मध्ये त्यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांना अद्याप एकदाही उपांत्य फेरी मात्र गाठता आलेली नाही.

आमनेसामने

  • उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी अर्जेंटिनाने ५ लढती जिंकल्या आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. स्वित्झर्लंडने आजवर एकदाही अर्जेंटिनाला नमवलेले नाही.

  • विश्वचषकात अर्जेंटिना व स्वित्झर्लंड तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. यापूर्वी १९६६ व २०१४ मध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध विश्वचषकात खेळले होते. या दोन्ही वेळेस अर्जेंटिनाने त्यांच्याविरुद्ध सहज बाजी मारली आहे, हे विशेष.

अर्जेंटिना वि. स्वित्झर्लंड

  • स्थळ : कान्सास सिटी स्टेडियम

  • वेळ : सकाळी ६.३० वाजल्यापासून (रविवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in