

फॉक्सबरो : फिफा विश्वचषकात गुरुवारी मध्यरात्रीपासून उपांत्य फेरीचा थरार सुरू होत आहे. यंदा प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल चार स्थानी असलेले संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. फ्रान्स विरुद्ध स्पेन आणि अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड अशा उपांत्य लढती रंगतील. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होतील.
फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. पुढील रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याची आता सर्वांना चाहुल लागली असून त्यापूर्वी बुधवार, १५ जुलै रोजी फ्रान्स विरुद्ध स्पेन यांच्यातील उपांत्य सामन्यात कोण बाजी मारणार, हे पाहणेदेखील रंजक ठरेल.
दरम्यान, किलियान एम्बाप्पेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत ६ सामन्यांत १६ गोल नोंदवले आहेत. साखळीत फ्रान्सने इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली. तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. फ्रान्सने या स्पर्धेतील पाचपैकी चार सामन्यांत किमान ३ किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत. एम्बाप्पे, उस्माने डेम्बेले व ओलिस या आक्रमकांची फळी फ्रान्सची ताकद आहे. विशेषत: एम्बाप्पे ८ गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे. त्यामुळे तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीवर आघाडी टिकवण्यास आतुर असेल.
दुसरीकडे स्पेनने पोर्तुगाल, बेल्जियम या संघांना नमवले असून त्यांचा लॅमिन यमाल, ओयरझबाल यांच्याकडे लक्ष असेल. तसेच स्पेनने युरो चषकात फ्रान्सला धूळ चारली होती.
अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड लढतीतही थरार अपेक्षित आहे. इंग्लंडने उपांत्यपूर्व लढतीत नॉर्वेला धूळ चारली, तर अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडवर मात केली. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.