

मियामी : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून यजमान अमेरिका आणि मेक्सिकोचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांच्या तिकिटांच्या पुनर्विक्रीच्या (रिसेल) दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, 'फिफा'ने अंतिम सामन्यासाठी सुमारे १,२०० आसनांची तिकिटे प्रति तिकीट ७,३८० डॉलर दराने विक्रीसाठी खुली केली आहेत. तिकिटांच्या दराचा मागोवा घेणाऱ्या 'टिकपिक' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील एंगलवूड येथे शुक्रवारी झालेल्या स्पेन आणि बेल्जियम सामन्याच्या तिकिटाची सर्वात कमी किंमत १,३८१ डॉलरवर आली होती. अमेरिका संघ अंतिम १६ च्या फेरीत बेल्जियमकडून पराभूत होण्यापूर्वी याच तिकिटाचा दर ३,२६१ डॉलर इतका उच्चांकी होता.
फ्लोरिडामधील मियामी गार्डन्स येथे शनिवारी झालेल्या इंग्लंड आणि नॉर्वे सामन्याच्या तिकिटाचा किमान दर २,०४९ डॉलरवर घसरला, जो इंग्लंडने मेक्सिकोचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यापूर्वी ३,८६६ डॉलर होता. तसेच मिझोरीतील कन्सास सिटी येथे झालेल्या अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड सामन्याच्या तिकिटाचा किमान दर २,३८१ डॉलरवरून थेट १,१४२ डॉलरवर आला आहे. यजमान संघ स्पर्धेतून बाहेर पडल्याने तिकिटांची मागणी घटली असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.
शुक्रवारी सोफाय स्टेडियमबाहेर उभे असलेले रिव्हरसाईड येथील ६५ वर्षीय जेक वॅन बार्सेल यांनी सांगितले की, तिकिटांचे दर खूप जास्त असल्याने त्यांनी आधी सामना पाहण्याची कोणतीही योजना आखली नव्हती. मात्र त्यांच्या मुलाने तिकिटांचे दर कमी झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या १३ वर्षीय नातवासाठी प्रत्येकी १,००० डॉलर देऊन दोन तिकिटे खरेदी केली. या आठवणीसाठी हा खर्च जास्त नसून आम्ही सामन्याचा आनंद घेत असल्याचे बार्सेल म्हणाले.