

वॉशिंग्टन : फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी अधिक तिकिटे उपलब्ध करून देण्याची घोषणा फुटबॉलची नियामक संस्था ‘फिफा’ने केली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून (ईडीटी) सर्व १०४ सामन्यांसाठी प्रवर्ग १, २ आणि ३ सह नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘फ्रंट’ श्रेणीची तिकिटे विक्रीसाठी खुली होतील.
‘फिफा’ने या महिन्यात तिकिटांची नवीन आणि महागडी श्रेणी जोडल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पहिल्या फेरीत श्रेणी-३ च्या तिकिटांची किंमत १४० डॉलर्सपासून सुरू झाली होती, तर अंतिम सामन्यासाठी ती ८,६८० डॉलर्सपर्यंत होती. मात्र, १ एप्रिलपासून सुरू झालेल्या विक्रीत या किमती वाढवून १०,९९० डॉलर्सपर्यंत नेण्यात आल्या आहेत. चांगल्या जागा राखून ठेवल्याचा आणि चाहत्यांना गैरसोयीच्या जागा दिल्याचा आरोप करत अनेक चाहत्यांनी ऑनलाइन माध्यमातून या निर्णयावर टीका केली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील सामन्यांच्या तिकीट विक्रीला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे ‘द ॲॅथलेटिक’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. १२ जून रोजी इंगलवूड येथे होणाऱ्या अमेरिका विरुद्ध पॅराग्वे सामन्यासाठी आतापर्यंत ४०,९३४ तिकिटांची विक्री झाली आहे. तसेच १५ एप्रिल रोजी होणाऱ्या इराण विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी ५०,६६१ तिकिटे विकली गेली आहेत. सोफाय स्टेडियमची क्षमता सुमारे ६९,६५० इतकी असून, अमेरिका-पराग्वे सामन्याची तिकिटे १,१२० ते २,७३५ डॉलर्सदरम्यान विकली जात आहेत.