वानखेडेची पन्नाशी; सुवर्णमहोत्सव दणक्यात साजरा, भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत रंगला शानदार सोहळा

प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या वानखेडे स्टेडियमचा ५०वा वर्धापन दिन रविवारी दणक्यात साजरा करण्यात आला.
क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला रविवारी म्हणजेच १९ जानेवारीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त रविवारी स्टेडियमवर शानदार सोहळा आयोजित करण्यात आला.
क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला रविवारी म्हणजेच १९ जानेवारीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त रविवारी स्टेडियमवर शानदार सोहळा आयोजित करण्यात आला. एक्स @ICC
Published on

मुंबई : प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या वानखेडे स्टेडियमचा ५०वा वर्धापन दिन रविवारी दणक्यात साजरा करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी मुंबईसह भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू आवर्जून उपस्थित होते.

संगीतकार अजय-अतुल तसेच विशाल-शेखर यांच्या संगीतमय सोहळ्याने ही संध्याकाळ रंगली. तसेच लेझर शोचा देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री यांसारख्या माजी क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यावेळी उपस्थित होते.

१९७४मध्ये बांधणी करण्यात आलेल्या या स्टेडियमवर १९७५मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत वानखेडेने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. वानखेडेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी एमसीएने १२ ते १९ जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील क्रीडा पत्रकार तसेच एमसीएच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सामना खेळवण्यात आला. त्यानंतर सुनील गावस्कर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संजय मांजरेकर, सिद्धेश लाड, वासिम जाफर, पृथ्वी शॉ यांसारख्या मुंबईच्या माजी कर्णधार तसेच खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच विनोद कांबळीनेही यावेळी वानखेडे गाठले होते.

त्याशिवाय १५ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमच्या मैदानी कर्मचाऱ्यांचा खास गौरव करण्यात आला. यावेळी रमेश म्हामुणकर आणि त्यांचा चमू उपस्थित होता. तसेच यावेळी खास स्मरणिकेचेसुद्धा प्रकाशन करण्यात आले. एकंदरच गेल्या आठवडाभर वानखेडेवर उत्साहाचे वातावरण होते. यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या सोहळ्याकडे लागून होते. अवधुत गुप्तेच्या मी मराठी, महाराष्ट्र माझा या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर सचिन तेंडुलकरसह खास संवाद साधण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in